Hingoli Agriculture News : कोरड्या दुष्काळाच्या सावटाने शेतकरी हवालदिल

निसर्ग जगू देईना, सरकार साथ देईना!
Hingoli Agriculture News
Hingoli Agriculture Newspudhari photo
Published on
Updated on

गिरगाव : आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाच्या नशिबी पुन्हा एकदा चिंतेचे ढग जमा झाले आहेत. पावसाच्या प्रदीर्घ ताणानंतर संपूर्ण गिरगांव परिसरात कोरड्या दुष्काळाचे सावट गडद झाले असून,हातातोंडाशी आलेली पिके डोळ्यांदेखत करपून जात आहेत. निसर्ग जगू देईना आणि सरकार साथ देईना, अशा दुहेरी कात्रीत सापडलेला बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडून मदतीचा मोठा गाजावाजा करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशा वांझट घोषणांची खैरात सरकारकडून करण्यात येते पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या पदरी काहिच पडतं नाही.प्रत्यक्षात शेतात पंचनाम्यासाठी अद्याप एकही अधिकारी पोहोचलेला नाही.

Hingoli Agriculture News
Parbhani rainfall shortage : कोरड्या दुष्काळाने सोयाबीन करपले; सणासुदीत शेतकरी त्रस्‍त

महसूल व कृषी विभागाचा हा भोंगळ कारभार आणि प्रशासकीय अनास्था पाहता,सरकारी मदत म्हणजे केवळ कागदी घोडे आणि आश्वासनांची खैरात ठरली आहे. बँकांचे कर्ज,खते-बियाण्यांचे वाढलेले भाव आणि त्यातच पावसाची दांडी यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. पेरणीसाठी लावलेले भांडवलही आता वसूल होण्याची शक्यता राहिलेली नाही.

मुलांचे शिक्षण,मुलींचे लग्न आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा,या विवंचनेत बळीराजा सापडला आहे. पावसाने तर दगा दिलाच, पण मदत जाहीर करणारे सरकारही प्रत्यक्ष मदतीचा एक रुपया हातात टेकवत नाही. कोरड्या पोकळ घोषणांनी आमचे पोट भरत नाही,आता केवळ मदतीचे नाटक बंद करून सरकारने तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Hingoli Agriculture News
Bhiklya Dhinda: मनोरच्या महाराजांच्या चरणी पद्मश्री भिकल्या धिंड्या; तारप्याच्या सुरांनी पालघरच्या संस्कृतीचा गौरव
  • गिरगांव व परिसरातील परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, सरकारने कागदी घोडे नाचवणे थांबवून संपूर्ण परिसर तात्काळ दुष्काळग्रस्त जाहीर करावा.तसेच पीक विम्याची रक्कम कोणतीही अट न घालता त्वरित वितरीत करावी.शेतीची सर्व प्रकारची कर्जमाफी करून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे.जनावरांसाठी छावण्या व पाण्यासाठी टँकरची त्वरित सोय करावी.आता सरकारने खोट्या आश्वासनांचा खेळ थांबवून प्रत्यक्ष कृती केली नाही तर बळीराजाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया गिरगांव परिसरातील शेतकरी देत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news