

आखाडा बाळापूर : नांदेड-हिंगोली महामार्गावरील भाटेगाव येथील वळण रस्त्यावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अपघाताची घटना घडली. अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून ट्रकसह मालाचे नुकसान झाले.
सांगोला येथून पाटणाकडे फळांची वाहतूक करणारा ट्रक क्र. एम एच 34 बी.झेड. 3698 भाटेगावच्या धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्यावरील दुभाजकावर जाऊन पलटी झाला.
या ट्रकमध्ये चिकू, खरबूज, अंगूर आदी विविध प्रकारची फळे भरलेली होती. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक पलटी होताच रस्त्यावर सर्वत्र फळांचा सडा पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, डोंगरकडा येथील जमादार संतोष नागरगोजे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी व बघ्यांनी पडलेल्या फळांचा आस्वाद घेत जमेल तेवढी फळे सोबत घेऊन जात असताना दिसून आले. काही वेळातच रस्त्यावरील बहुतांश फळे प्रवाशांनी उचलून नेल्याचे चित्र दिसून आले. याठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.