

Fraud committed by posing as a Railway Department official
कळमनुरी, पुढारी वृत्तसेवा : खंडवा रेल्वेच्या जीआरपीचा एसएचओ असल्याचे सांगून कळमनुरी तालुक्यातील एका महिलेचा मृतदेह नेण्यासाठी नातेवाईकांकडे पैसे नसल्याने पाच हजार रुपये पाठविण्याची मागणी केली. पैसे पाठवून अधिक चौकशी केल्यानंतर संबधित व्यक्ती बोगस असल्याचे स्पष्ट झाल्याने कळमनुरी पोलिस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कळमनुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमकुमार माकोडे यांना शुक्रवारी दुपारी फोन आला. यामध्ये संबंधित व्यक्तीने त्याचे नाव मनोजकुमार गुप्ता असून खंडवा रेल्-वेच्या जीआरपीचा एसएचओ असल्याचे सांगितले. तुमच्या तालुक्यातील रामवाडी येथील खुशबु मोहन पाटील या महिलेचा रेल्वेने कटून मृत्यू झाला आहे. त्यांचे नातेवाईकांची आर्थिक परिस्थिती बेताची असून त्यांना मृतदेह नेण्यासाठी आईस बॅगची गरज आहे.
त्यासाठी त्यांना पाच हजार रुपये पाठविण्याची विनंती केली. दरम्यान, सदर प्रकार पोलिस निरीक्षक माकोडे यांनी सामाजिक कार्यकर्ते वैभव चौधरी यांना सांगितला. यावेळी चौधरी यांनी गुप्ता याने पाठविलेल्या सीताराम कुर्मी नावाचा क्यूआर कोड पाठविला.
त्यानंतर चौधरी यांनी त्या क्यूआर कोडवर पाच हजार रुपयांची रक्कम पाठविली. मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी रामवाडी गावात खुशबू पाटील नावाची महिला आहे काय याचा शोध घेतला. मात्र त्या नावाची महिलाच गावात नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी मनोजकुमार गुप्ता याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मोबाईल लागला नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीने बनावट नांव सांगून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिस निरीक्षक माकोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसांनी मनोजकुमार गुप्ता याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रघुनाथ शेवाळे पुढील तपास करीत आहेत.