

गौतम बचुटे
केज : दोन लाख रुपये घेवून बनावट लग्न लावल्यानंतर अवघ्या तीन तासातच शौचाच्या बहाण्याने नवरी पळून गेली होती. त्या नवरीला आणि नात्याने तिची मावशी म्हणून सांगणाऱ्या बनावट मावशीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दलाल आणि त्या बनावट नवरीची आणखी एक बनावट नातेवाईकांच्या मागावर पोलिस आहेत.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोदरी (ता. अंबाजोगाई) येथील ३६ वर्ष वयाच्या तरुण नागेश देविदास जगताप याचे प्रल्हाद गुळभिले या छत्रपती संभाजीनगर येथील एजंटने १ लाख ९० हजार रु. घेऊन दि. ६ डिसेंबर रोजी १२:३० वा. दिपेवडगांव तालुका केज येथे हनुमानाच्या मंदिरात प्रिती शिवाजी राऊत या तरुणीशी लग्न लावले. त्यानंतर ते सर्वजण कोदरी येथे गावी गेले. त्यावेळी नववधू प्रिती राऊत हिने तिला शौचास जाण्याचे बहाण्याने पळून गेली होती. तिचा शोध घेत असताना प्रीती ही डिघोळअंबा पाटी जवळ मिळुन आली. तेव्हा त्यांनी तिला का पळुन चालली ? असे विचारले असता तिने पोलीसांना फोन करून मदत मागितली होती.
पोलिसांनी प्रीती राऊत, नागेश जगताप यांची चौकशी केली असता या बनावट लग्नाची माहिती उजेडात आली. खोट्या लग्नाच्या अमिषाला बळी पडून फसवणूक झालेला तीन तासाचा नवरदेव नागेश जगताप यांच्या तक्रारी वरून युसुफवडगाव पोलिस ठाण्यात एजंट सतिष प्रल्हाद गुळभिले, नवरी प्रिती शिवाजी राऊत, तिची बनावट मावशी सविता, आणि माया राऊत या चौघा विरुध्द गु. र. नं. ३०९/२०२५ भा. न्या. सं. ३१८(२), ३१८(४), ३(५) गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मावशीच्या चाकणमधून आवळल्या मुसक्या
या प्रकरणी गुन्हा दाखल होताच तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे, पोलिस कॉन्स्टेबल धनंजय कारले आणि एका महिला कर्मचाऱ्यांनी त्या बनावट नवऱ्या मुलीची मावशी म्हणून नाते सांगणारी माया सतीश राऊत हिला चाकण मधून ताब्यात घेतले.
लवकरच उर्वरित आरोपींच्या मुसक्या आवळल्या जाणार
या बनावट लग्न प्रकरणातील एजंट म्हणून गुन्हा दाखल असलेला प्रल्हाद गुळभिले आणि सविता ( पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. त्या नंतर त्यांची कसून चौकशी करून पोलिसी हिसका दाखविल्या नंतर त्यांच्या कडून विविध गुन्हे आणि अनेकांची झालेली फसवणूक याची माहिती उजेडात येईल.
दोघींना न्यायालयीन कोठडी
पोलिसांच्या ताब्यात असलेली नकली नवरी प्रीती शिवाजी राऊत आणि माया सतीश राऊत या दोघींना पोलिसांनी न्यायालयात हजर.केले असता दोघींना १४ दिवसांची न्यायालयीन.कोठडीत ठेवल्याचा आदेश दिला आहे.या बनावट लग्न लावून देणाऱ्या टोळीतील आरोपी ही सराईत गुन्हेगार असण्याची आणि त्यांनी अशा प्रकारे अनेकांची फसवणूक केल्याची शंका असून पोलिस त्याचा तपास करीत आहेत. चार पैकी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने सहाय्यक पोलिस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे आणि तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक भिमराव मांजरे यांचे कौतुक होत आहे.