

शेतामध्ये काम करत असताना लोंबकळत पडलेल्या विद्युतवाहिनीचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील बेलमंडळ येथे मंगळवारी (दि.27) सकाळी आठच्या सुमारास घडली. नागेश सूर्यभान मुधोळ (वय.३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. स्वतःच्या शेतामध्ये सोयाबीन पिकाला फवारणी करण्यासाठी गेल्यानंतर पडलेल्या विजेच्या तारांना अडखडून शॉक लागल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
बालाजी बळीराम मुधोळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, नागेश मुधोळ हे शेतकरी सोयाबीन पिकाला किटकनाशकाची फवारणी करण्याकरता शेतामध्ये गेले होते. सकाळच्या सुमारास शेतामध्ये विद्युत पुरवठा होत असलेल्या तारांना अडकून शॉक लागून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळतात आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार विष्णुकांत गुट्टे ,फौजदार गणेश गोटके,शेख अन्सार, शिवाजी पवार, गजानन सरकटे, यांनी सहकार्यासह घटनास्थळी जाउन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.