

Farm laborers put their house up for sale to repay debt
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या कर्जाच्या हप्त्यासाठी तगाद्याला कंटाळून भूमिहीन शेतमजूर व बचतगटाच्या महिलांनी राहते घरच विक्रीला काढले आहे. गुरुवारी गावकऱ्यांनी घरावर थेट विक्रीचे पोस्टर्स चिटकवले आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
वाघजाळी येथील शेतमजूर व महिला बचत गटांनी विदर्भातील मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून सुमारे दीड वर्षांपूर्वी कर्ज घेतले होते. या कर्जाचा मासिक हप्ता सुमारे ३,५०० ते ४,००० रुपये आहे; मात्र यावर्षी तीव्र दुष्काळी परिस्थितीमुळे हाताला काम नसून शेतीचे उत्पादनही ठप्प आहे. यामुळे ग्रामीण अर्थकारण पार बिघडून गेले असून बचतगटांचे लहान-मोठे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत. कर्जाचे हप्ते थकल्यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून हप्त्यांसाठी अघोरी तगादा लावला जात आहे.
या संदर्भात शेतमजूर धम्मरत्न मोरे यांनी सांगितले की, विदर्भातील दोन कंपन्यांकडून १७,००० व ४०,००० रुपयांचे कर्ज घेतले होते. हप्ता थकल्यामुळे वसुली अधिकारी बुधवारी थेट घरी येऊन बसले होते; त्यांची भाषा अत्यंत चुकीची होती. या जाचाला कंटाळून घर विक्रीला काढले आहे. तर विदर्भातील कंपनीकडून ८० हजारांचे कर्ज घेतलेल्या चंद्रभागाबाई मोरे यांनीही वसुलीच्या तगाद्याला कंटाळून राहते घर विक्रीस काढल्याची व्यथा मांडली.
पालकमंत्र्यांना केवळ विकासाच्या टक्केवारीतच रस असून त्यांना नागरिकांशी देणे-घेणे नाही, असा आरोप क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी केला आहे. एकीकडे मुख्यमंत्री कर्ज वसुली करू नका म्हणतात; तर दुसरीकडे फायनान्स कंपन्यांचा तगादा सुरूच आहे, असेही ते म्हणाले.