

हिंगोली : जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यकारणी व जिल्हा बुथ कमिटी, बी.एल.ए. यांचा रविवारी (दि.४) येथील मधुरदिप पॅलेस मंगल कार्यालयात मेळावा पार पडला. या मेळाव्याकडे माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवली. खुद्द जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई देखील मेळाव्याला गैरहजर राहिले. विशेष म्हणजे मेळाव्याच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या मुख्य बॅनरवरून माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांचे छायाचित्र वगळल्याने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीसाठी केवळ दोन महिन्याचा अवधी शिल्लक असताना जिल्हा काँग्रेसमध्ये सुरू असलेली गटबाजी पक्षश्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. काही दिवसांपुर्वीच माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी गोरेगाव येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मोठा प्रतिसाद मिळाल्याने काँग्रेसच्या तिसर्या गटातील काहींनी एकत्र येत रविवारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अॅड. सचिन नाईक, विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव, प्रकाश थोरात, अनिल नैनवाणी, सुधीर सराफ, शामराव जगताप, विलास गोरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यापूर्वी काँग्रेसच्या वतीने शहरातून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. शेकडो गाड्यांचा ताफा कार्यक्रमस्थळी दाखल झाला. परंतू या मेळाव्यास माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यासह त्यांचे समर्थक गैरहजर दिसून आले. तर जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई हे देखील मेळाव्यास उपस्थित नसल्याने मेळावा स्थळी गटबाजीची चर्चा सुरू होती. दरम्यान या संदर्भात माजी आमदार भाऊ पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मला शनिवारी रात्री उशिरा जिल्हाध्यक्ष देसाई यांचा मेळाव्यासंदर्भात निरोप आला. ऐनवेळी निरोप आल्याने मी मेळाव्यास उपस्थित राहू शकलो नाही तर जिल्हाध्यक्ष देसाई हे नियमित आरोग्य तपासणीसाठी हैदराबाद येथे गेल्याचे सांगण्यात आले. परंतू काँगे्रसमध्ये विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव व माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर या दोन्ही गटाचे एकमेकांशी जुळत नसल्याचे अनेकदा दिसून आले. आजच्या मेळाव्यात पुन्हा काँग्रेसमधील गटबाजी दिसून आल्याने हिंगोली विधानसभेचा गड काँग्र्रेस कसा सर करणार हा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे.
काँग्रेसमध्ये हिंगोली विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी मोठी स्पर्धा दिसून येत आहे. यातून एकमेकांना डावलण्याचा प्रकार घडतो आहे. पक्षात निकोप स्पर्धा गरजेची आहे. परंतू निव्वळ एकमेकांना पाण्यात पाहिले जात असल्याने काँग्रेसच्या पदाधिकार्यांची ताकद एकमेकांचा विरोध करण्यातच खर्च होत आहे. विरोधकांशी दोन हात करण्यासाठी पक्षसंघटना मजबूत असणे गरजेचे आहे. परंतू हिंगोली काँग्रेस मात्र गटातटात विभागल्या गेल्याने विधानसभा निवडणुकीला काँग्रेस कशी सामोरे जाणार असा प्रश्न देखील आता उपस्थित होऊ लागला आहे.