

Action initiated against 58 accused in Rs 43 crore scam case
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : येथील महिला अर्बन व न्यू अर्बन पत संस्थेमधील एकूण ४३ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आता पतसंस्थेचे संचालक व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेवर बोजा टाकण्याची कारवाई सहाय्यक निबंधक कार्यालयाने सुरु केली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांतच दोन्ही गुन्ह्यातील ५८ आरोपींच्या मालमत्तेवर टाच येणार आहे.
येथील महिला अर्बन व न्यू अर्बन पतसंस्थेमध्ये अध्यक्ष जयेश खर्जुले व त्याची पत्नी रोहिणी खर्जुले यांच्यासह संचालक व कर्मचाऱ्यांनी ४५ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यांनी ठेवीदारांचे पैसे परत केले नसल्याचे ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती.
त्यानुसार जिल्हा उपनिबंधक सुरेखा फुफाटे, सहाय्यक निबंधक माधव यादव यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या विशेष लेखा परीक्षणात महिला अर्बन पतसंस्थेत सुमारे ३१ कोटी रुपये तर न्यू अर्बन पतसंस्थेत १२ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात एकूण ५८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवून त्यांच्या मदतीसाठी विशेष पथक देखील नियुक्त केले आहे. या प्रकरणात आता पर्यंत ८ जणांना अटक झाली आहे.
यामध्ये जयेश खर्जुले व रोहिणी खर्जुले यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणात आता ठेवीदार व सभासदांचे हित लक्षात घेऊन पोलिस प्रशासन व सहकार विभागाकडून दोन्ही पतसंस्थेच्या संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांच्या स्थावर व जंगम मालमत्तेवर बोजा चढविणे तसेच जप्तीची कारवाई सुरु केली आहे. तसेच त्यांची मालमत्ता विक्रीस मनाई करण्याबाबतच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. त्यानुसार त्यांच्या मालमत्तेची माहिती घेतली जात आहे. तर ठेवीदार व नागरिकांनीही त्यांच्या मालमत्तेची माहिती सहाय्यक निबंधक कार्यालयास देण्याचे आवाहन सहाय्यक निबंधक माधव यादव यांनी केले आहे.
सहकार विभागाच्या या कारवाईमुळे दोन्ही पतसंस्थेच्या संचालक, कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेवर टाच येणार आहे. या मालमत्ता विक्री करून ठेवीदारांचे पैसे दिले जावे अशी अपेक्षाही ठेवीदारांकडूनही व्यक्त केली जात आहे.