

Elections to Vasmat Local Government Bodies
वसमत : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी पुढील आठवड्यात निवडणुका जाहीर होतील असे संकेत मिळत असल्याने जिल्हा परिषदेच्या आंबा गटामध्ये इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा गट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबा गटातून यंदाच्या निवडणुकीत दिग्गज आपले नशीब आजमावणार असल्याने आंबा गट चर्चेत आला आहे.
वसमत विधानसभा मतदार संघात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आंबा गटात बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले असतानाच त्यांनी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून बोखारे पांगरा येथील सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण बोखारे यांनी मागील काही दिवसांपासून निवडणुकीची तयारी केली असून कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठीभेटीवर भर दिला आहे.
आंबा सर्कलच्या राजकारणातील किंगमेकर म्हणून ओळख असलेल्या अंबादास मामा भोसले यांचे हे सर्कल आहे. ते शरद पवार गटाचे नेते आहेत. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे ते अत्यंत विश्वासु म्हणून ओळखले जातात. त्यांच्या भुमिकेकडेही इच्छुकांचे लक्ष लागले आहे. आंबा जिल्हा परिषद सर्कलमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून बाजार समितीचे उपसभापती सचिन अंबादास भोसले यांच्यासह देविदास चव्हाण, गोविंद कदम वाईकर यांनी देखील निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून १२ ते १३ उमेदवार इच्छुक आहेत. परंतू सचिन भोसले, देविदास चव्हाण, गोविंद कदम या तिघांपैकी एकाच्या गळ्यात माळ पडणार असल्याचे बोलले जात आहे. भाजपकडून श्रीनिवास भोसले, नरहरी पांचाळ यांनी तयारी सुरू केली आहे तर काँग्रेसकडून ऋषिकेश देशमुख यांनी देखील निवडणुक लढविण्याचे संकेत दिले आहेत. तसेच माजी पंचायत समिती सदस्य तथा जवळा बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय चव्हाण यांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उडी घेण्याचा निर्धार केला आहे.
इच्छुकांनी गावोगावी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसातच निवडणुकीची घोषणा होणार असल्याने निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसल्याचे चित्र आहे. दरम्यान, वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन भोसले यांनी सांगितले की, मी जिल्हा परिषद आंबा गटातून निवडणुकीसाठी इच्छुक आहे. आमदार राजूभेव्या नवघरे यांनी ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे काम आम्ही करणार आहोत.
मतदारांमध्ये संभ्रम
आंबा जिल्हा परिषद गटातून निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन भोसले हे आमदार राजू नवघरे यांचे कट्टर समर्थक आहेत तर आंबा सर्कलच्या राजकारणाचे किंगमेकर म्हणून ज्यांना ओळखले जाते ते आंबादास भोसले हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. वडील एका पक्षात तर मुलगा दुसऱ्या पक्षात असे चित्र असल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. सचिन भोसले यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यास अंबादास भोसले यांची भूमिका काय राहणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.