

Krushi Kendra owners strike
जवळाबाजार : राज्यातील कृषि विक्री केंद्र धारकांनी कृषी विभागाच्या धोरणांविरोधात एकदिवसीय दुकानबंद आंदोलन छेडले. कृषी विभागाकडून विविध जाचक अटी लादण्यात आल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक माल खरेदी करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या अटी तत्काळ रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे.
राज्याच्या कृषी विभागाने मागील वर्षभरात बियाण्यांच्या उत्पादनापासून विक्रीपर्यंत नियंत्रण ठेवण्यासाठी नवे पोर्टल प्रणाली लागू केली आहे. यामध्ये कंपन्या आणि घाऊक विक्रेत्यांसाठी ‘पोर्टल १’ आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी ‘साधा पोर्टल २’ वापरण्याचे धोरण अंमलात आणण्यात आले आहे. मात्र, ‘साधा पोर्टल २’ च्या अंमलबजावणीमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून, शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारा माल उशिराने मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर २८ ऑक्टोबररोजी राज्यभरातील सर्व कृषी विक्री केंद्र धारकांनी आपली दुकाने एक दिवस बंद ठेवून निषेध नोंदविला. जवळाबाजार येथील कृषी केंद्रांनीही सकाळपासून दुकान बंद ठेवून ‘साधा पोर्टल २’ स्थगित करण्यात यावे, अशी ठाम मागणी केली आहे.