हिंगोली : 'पाणंद रस्ता करा अन्यथा हेलिकॉप्टर द्या'; नाही तर आंदोलन

कलगाव शेतकऱ्यांची मागणी: पाणंद रस्ता करा अन्यथा हेलिकॉप्टर द्या
Hingoli news
हिंगोली-कलगाव येथील पाणंद रस्ता करण्याची मागणी होत आहेPudhari
Published on
Updated on
गजानन लोंढे, हिंगोली

हिंगोली : तालुक्यातील कलगाव येथील शेतकर्‍यांना पाणंद रस्ता मंजूर असतानाही त्या रस्त्याचे काम राजकीय दबावापोटी बंद पाडले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतात जाण्यासह विद्यार्थ्यांना शाळेत भांडेगाव येथे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. एक तर संबंधित विभागाला सुचना देऊन रस्ता करावा अन्यथा शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केल्याने चक्‍क जिल्हाधिकारी अवाक् झाले.

Hingoli news
हिंगोली : हेमंत पाटील यांच्या पुनर्वसनाचे शिंदे सेनेसमोर आव्हान

शेतकऱ्यांचे प्रचंड हाल

गुरूवारी कलगाव येथील ३० ते ४० शेतकर्‍यांनी जिल्हा प्रशासनास निवेदन देऊन आपली कैफीयत प्रशासनाच्या कानावर घातली. कलगाव ते भांडेगाव हा ४ किलोमीटरचा पाणंद रस्ता आहे. या रस्त्याला क्रमांक देखील मिळाला असून रस्त्याच्या कामाची मंजुरी मिळाली आहे. ९० टक्के शेतकर्‍यांची पाणंद रस्त्याला संमती असतानादेखील राजकीय लोकांच्या दबावापोटी व द्वेषापोटी रस्त्याचे काम बंद पाडल्याचा आरोप शेतकर्‍यांनी केला. कलगाव येथील शेतकर्‍यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड हाल होत आहेत.

Hingoli news
Pradnya Satav : सातव यांना पुन्हा विधान परिषदेसाठी काँग्रेसची उमेदवारी

भांडेगावला जाण्यासाठी रस्ताच नाही..

शेतात जावे कसे, काम करावे कसे व पिक कसे जोपासावे असा प्रश्‍न येथील शेतकर्‍यांना पडला आहे. विशेष म्हणजे कलगाव येथून आठवी पासून बारावीपर्यंतच्या शिक्षणासाठी मुला-मुलींना शिक्षण घेण्यासाठी भांडेगाव येथे जावे लागते. परंतु, भांडेगावला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने विद्यार्थ्यांना चिखल तुडवत शाळेत जावे लागत आहे. कलगाव येथील नागरिकांना आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी भांडेगाव येथेच जावे लागते. त्यामुळे कलगावच्या ग्रामस्थांना पावसाळ्यात प्रचंड त्रासास सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने या बाबींचा विचार करून संबंधित विभागाला सांगून रस्त्याचे काम करावे ते शक्य न झाल्यास शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करावी अन्यथा शेतकऱ्यांकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Hingoli news
हिंगोलीत 'महाआघाडी'त फटाके : खा. अष्टीकरांचा आ. सातव यांच्या विरोधात लेटरबॉंब

शेतकर्‍यांकडून चक्‍क हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आल्याने प्रशासन बुचकळ्यात पडले आहे. निवेदनावर विकास पौळ, सोपान पौळ, अनिल पौळ, भाऊराव पौळ यांच्यासह अनेक शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

मागील पंधरा दिवसांपासून शेतशिवारात पेरणीची लगबग सुरू आहे. परंतु, कलगाव येथील अनेक शेतकर्‍यांना पेरणीसाठी डोक्यावर बियाणे, खत तसेच औत न्यावे लागले. पेरणीसाठी या भागातील शेतकर्‍यांना प्रचंड कष्ट सोसावे लागले. परंतु प्रशासनाला मात्र या गंभीर बाबींचे सोयरसुतक नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गजानन कावरखे यांनी केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news