

Crime Branch to investigate Rs 47 crore fraud
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरातील दोन पत संस्थेमधील एकूण ४७ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता आर्थिक गुन्हे शाखेने पोलिस ठाण्याच्या मदतीने आरोपींच्या अटकेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत.
शहरातील नवा मोंढा भागात असलेल्या महिला अर्बन क्रेडिट पतसंस्था व न्यू अर्बन पतसंस्था यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. सभासदांच्या नावे बनावट कर्ज उचलणे तसेच जादा व्याजदरांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ठेवी ठेऊन घेणे व मुदतीनंतरही ठेवीची रक्कम न देणे यासह इतर प्रकार घडले आहेत.
या प्रकरणात ठेवीदारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयांसह थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून तक्रारीही केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणात जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लेखा परिक्षण केले होते. दरम्यान, या प्रकरणी १९ ऑगस्ट रोजी महिला अर्बन क्रेडिट पत संस्थेमधील ३५ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात संचालक मंडळासह ३३ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी न्यू अर्बन पत संस्थेमधील १२ कोटींच्या अपहार प्रकरणात संचालकांसह २५ जणांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, या अपहार प्रकरणात सर्व समान्य नागरिकांची रक्कम अडकून पडली असून मोलमजूरी करून जमा केलेली रक्कम परत मिळणार कि नाही याची चिंता ठेवीदारांना लागली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या दोन्ही प्रकरणांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.
66 आता आर्थिक र्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या लक्षात घेता त्यांच्या अटकेसाठी हिंगोली शहर पोलिसांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या वतीने सांगण्यात आले.