

This year, one and a half lakh Navsa modaks will be distributed.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मोदकाचा गणपती म्हणून प्रसिध्द असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी अनंत चतुर्दशीला देशभरातून लाखो भाविक येत असतात. संस्थानकडून यावर्षी १.५१ लाख नवसाचे मोदक वाटप केले जाणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. गणेश चतुर्थीच्या दिवशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून श्रींची पालखी निघणार आहे. त्यानंतर दहा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
येथील विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मोदकाचा गणपती म्हणून देशभरात प्रसिध्द आहे. अनंत चतुर्थीच्या दिवशी नवसाचा मोदक दिला जातो. संपूर्ण वर्षभर या मोदकाची पूजा केली जाते. त्यानंतर नवस पूर्ण झाल्यानंतर १००१ मोदक गणपतीला अर्पण केले जातात. दरवर्षी या ठिकाणी अनंत चतुर्थीला मोदक घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
या शिवाय नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांचीही गर्दी होते. विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ६ सप्टेंबर रोजी सकाळी संस्थानच्या विश्वस्तांच्या उपस्थितीत महा आरती झाल्यानंतर नवसाच्या मोदकाचे वाटप केले जाणार असून यावर्षी १.५१ लाख मोदकांचे वाटप केले जाणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.
यावर्षी गणेशमुर्ती स्थापनेपासून दर्शनासाठी बाहेर गावाहून आलेल्या भाविकांच्या भोजनाची व्यवस्था संस्थानकडून करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी शहरातील स्वयंसेवक देखील मदतीला असणार आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला असून संस्थानकडून तयारी सुरू झाली आहे.
दहा दिवसांत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यासाठी महसूल विभाग, गृह विभाग, आरोग्य विभाग, नगर परिषद तसेच महावितरणचे यासाठी सहकार्य राहणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले.