

हिंगोली : राज्यात सर्वाधिक हळदीचे उल्पन्न घेणारा जिल्हा म्हणून हिंगोलीची ओळख आहे. हळदीच्या लागवडीबरोबरच बाजारपेठही नावलौकिकास येत आहे. येथे मंजूर झालेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास यंदाच्या अर्थसंकल्पात एक रूपयाही आर्थिक तरतूद करण्यात आली नसल्याने येथील हळद संशोधन केंद्रास काम होण्यापुर्वी घरघर लागण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. हळद संशोधन केंद्रास तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा यासाठी बुधवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित करून सरकारचे लक्ष वेधले.
महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यतील वसमत येथे हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रास मंजूरी देऊन त्यासाठी १०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून प्रत्यक्षात हळद संशोधन केंद्राचे काम सुरू झाले. सध्या या केंद्राच्या प्रक्षेत्रावर तब्बल ३५ पेक्षा अधिक हळदींच्या जातींची लागवड करण्यात आली आहे. हा महत्वकांक्षी प्रकल्प ८५० कोटी रूपयांचा असून आतापर्यंत केवळ १०० कोटीच उपलब्ध झाले आहेत. दोन दिवसांपुर्वी महायुतीच्या शासनाने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात वसमत येथील हळद संशोधन केंद्रास भरीव निधी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु, प्रत्यक्षात मात्र एक रूपया देखील निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला नाही. ही बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बुधवारी विधान परिषदेत प्रश्नाद्वारे उपस्थित करून हळद संशोधन केंद्रासाठी निधीची मागणी केली.
विदर्भासह मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यातून हिंगोली व वसमत येथील बाजारपेठेत हळद मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येते. दरवर्षी जवळपास ४ लाख क्विंटल हळदीची उलाढाल होते. हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून हळदीवर संशोधन करून दर्जेदार वाण तयार करण्याबरोबर हळदीवरील प्रक्रिया उक्षेगाला चालना देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु, यंदाच्या अर्थसंकल्पात हळद संशोधन केंद्रासाठी निधीची तरतूद केली नसल्याने पुढील सर्व कामे ठप्प होणार आहेत. जिल्ह्यात जवळपास १ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात येते. लागवडीचे क्षेत्र हे दरवर्षी वाढत आहे. हळद उत्पादक शेतकर्यांना दर्जेदार बियाणे मिळाल्यास उत्पादनात वाढ होणार आहे. परंतु, या महत्वकांक्षी प्रकल्पाकडे यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने दुर्लक्ष केल्याने शेतकर्यांकडून नाराजीचा सूर उमटत आहे.
वसमत येथील हळद संशोधन केंद्राच्या अध्यक्षपदी आमदार हेमंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला आहे. हाच मुद्दा उपस्थित करीत विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी या प्रकल्पाच्या अध्यक्षास कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला आहे. परंतु, त्यांना साधे कार्यालय, खुर्च्या देखील नाहीत. संशोधन केंद्रास निधीही नाही. हेमंत पाटलांची गत ही ओसाड गावची पाटीलकी दिल्यासारखी झाल्याचा टोला दानवे यांनी सभागृहात लगावला.