

Hingoli crime news
हिंगोली: हिंगोली तालुक्यातील भांडेगाव येथे जुन्या वादातून झालेल्या गोळीबारात दोन जण ठार, तर दोघे जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले असून, या प्रकरणात तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील भांडेगाव येथील कुंडलीक जगताप आणि बाबाराव जगताप यांच्यामध्ये शेतीचा जुना वाद होता. या वादातून त्यांच्यात नेहमीच कुरबुरी होत होत्या. मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास कुंडलीक हे त्यांचा मुलगा शिवराज जगताप (२९), सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांना सोबत घेऊन बाबाराव जगताप यांच्या घरी गेले होते. यावेळी घराचा दरवाजा वाजविताच बाबारावने दरवाजा उघडला आणि बंदुकीतून गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. यामध्ये कुंडलीक यांना तीन गोळ्या लागल्या, तर त्यांचा मुलगा शिवराज यांच्या छातीवर गोळी लागली. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.
याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या सुभाष कुरवाडे आणि बालाजी जगताप यांनाही गोळ्या लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक शामकुमार डोंगरे, उपनिरीक्षक राहुल घुले, जमादार आकाश पंडितकर, रमेश जाधव, शंकर इडोळे, सुधीर ढेंबरे, प्रदीप राठोड, शेख रहिम यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तर पोलीस निरीक्षक संदीप मोदे, जमादार अशोक धामणे, अनिल डुकरे, संतोष करे, शेख मुजीब यांच्या पथकाने शासकीय रुग्णालय गाठले.
गावात रात्रभर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणात बाबाराव जगताप, विठ्ठल जगताप आणि ज्ञानेश्वर जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.