

Atul Save Controversial Statement
हिंगोलीः शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून राज्यात रान पेटले असताना भाजप नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांनी आपल्या पक्षाच्या जाहिरनाम्यात शेतकर्यांच्या कर्जमाफीचा कोणताही विषय नव्हता असा दावा केला आहे. त्यांचा हा दावा भाजपसाठी अडचणीचा ठरण्याची चिन्हे आहेत.
कॅबिनेट मंत्री अतुल सावे शनिवारी हिंगोलीच्या दौर्यावर होते. तेथील शासकीय विश्रामगृहात मोदी सरकारची यशस्वी 11 वर्षे या मुद्यावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे, आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, फुलाजी शिंदे, शिवा घुगे, उमेश नागरे आदी पदाधिकार्यांची उपस्थिती होती. यावेळी पत्रकारांनी अतुल सावे यांना शेतकर्यांना कर्जमाफी केव्हा देणार? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, आमच्या जाहिरनाम्यात कर्जमाफीचा विषय नव्हताच. तुम्ही जाहिरनामा तपासून पहा. त्यात ज्या बाबी नमूद आहेत, त्या प्राधान्यक्रमाणे पूर्ण केल्या जात आहेत.
नदीजोड प्रकल्प व वॉटर ग्रीडच्या 61 हजार कोटी रुपयांच्या आराखड्याच्या सर्वेक्षणासाठी निधी देण्यात आला आहे. देशातील हा सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. त्यामुळे राज्याची तहान भागणार आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात 50 वर्षे दुष्काळ पडला किंवा पाऊस पडला नाही तरी, समुद्रात जाणारे पाणी या महाराष्ट्राला मिळेल. यामुळे येणार्या काळात कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा शेतकर्यांना पाण्याची कमतरता भासणार नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अहमादाबादेतील विमान दुर्घटना सायबर हल्ल्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. अतुल सावे यांनी यासंबंधी संजय राऊत यांच्यावर टीका केली. विमान दुर्घटनेची चौकशी करण्यात येत आहे. त्यातून सर्व सत्य बाहेर येईल. अशा घटना सायबर अटॅकमुळे होत नाहीत. त्यामुळे राऊतांनी चुकीचे वक्तव्य करू नये, असे ते म्हणाले.
राज्यातील तांडावस्तीच्या कामांना स्थगिती दिल्याच्या प्रश्नावर अतुल सावे यांनी काही कामे अपूर्ण होती, ती कामे पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्या कामांना स्थगिती देण्यात आल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी आता नव्याने प्रस्ताव मागिवले जात आहेत. नवीन प्रस्ताव आल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल. दरम्यान, अतुल सावे यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपोषणावरही भाष्य केले. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची भेट झाली असून पुढील काही दिवसांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट होईल. त्यातून त्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील असे अतुल सावे म्हणाले.