

Akhada Balapur Sand Smuggling Case
आखाडा बाळापूर : आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर वाळू वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एक ट्रॅक्टर जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेठवडगाव गावाजवळ ही कारवाई करण्यात आली.
याप्रकरणी विशाल वसंतराव पतंगे, ग्राम महसूल अधिकारी, येहळेगाव ता. कळमनुरी) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी अक्षय भगवान चन्ने (वय अंदाजे ३० वर्षे, रा. पेठवडगाव ता. कळमनुरी) याने शासनाची महसूल बुडविण्याच्या उद्देशाने विनापरवाना वाळूची चोरी करून वाहतूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
कारवाईत निळ्या रंगाचा ट्रॅक्टर व लाल रंगाची ट्रॉली जप्त करण्यात आली असून ट्रॅक्टरमध्ये एक ब्रास वाळू आढळून आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ४ लाख १ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाने खान व खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.