

आखाडा बाळापूर : राज्य शासनाने बंदी घातलेल्या सुगंधित तंबाखू आणि गुटख्याच्या काळ्याबाजारावर आखाडा बाळापूर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक केला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तब्बल ४ लाख २० हजार ८०० रुपयांचा बेकायदेशीर साठा जप्त केला असून दोन जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
मंगळवारी, ६ जानेवारी रोजी दुपारी २ ते ३.१५ च्या सुमारास ही धडक कारवाई करण्यात आली. शहरातील इलियास नगर परिसर आणि जनसेवा मेडिकल स्टोअर्सजवळ प्रतिबंधित साठ्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली असता, साठवणूक केलेला सुगंधित तंबाखूचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला.
पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 'UK Zafrani Zarda No. 3300' या ब्रँडचा ५०० ग्रॅम वजनाचे एकूण ९ बॉक्स, ३९० डबे आणि ५६० कपडी पॅकेट्स असा मुद्देमाल जप्त केला आहे. अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन करून मानवी आरोग्यास घातक ठरणारा हा साठा विक्रीसाठी आणण्यात आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी सय्यद अहमद अली सय्यद कासिमत अली (वय ५४) आणि रशीद नंदकुमार पिंपळवार (वय ४१) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक (नांदेड परिक्षेत्र) यांच्या पथकातील सपोनी डी.जी. तलेदवार, अंमलदार प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ, कामाजी गवळी आणि आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विष्णूकांत गुटे, शेख अन्सार, शिवाजी पवार, अरविंद जाधव, पिराजी बेले यांच्या पथकाने ही संयुक्त कामगिरी फत्ते केली. या कारवाईमुळे अवैध गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.