

980 liquor bottles stolen from warehouse
आखाडा बाळापूर, पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत तोंडापूर शिवारात दारूचे गोदाम फोडून चोरट्यांनी ९८० दारुच्या बाटल्यांसह १.२१ लाखांचा मुद्देमाल पळवला आहे. या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यांतर्गत तोंडापूर शिवारात राजेंद्र कुमार शिखरे यांचे राज बार नावाचे बार आणि रेस्टॉरंट आहे. या परिसरातच त्यांच्या बारचे गोदाम असून त्या ठिकाणी विदेशी दारूचा साठा ठेवला आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गोदामाच्या पाठीमागील असलेले शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
यावेळी चोरट्यांनी गोदामातील दारुच्या बॉक्सची उचका उचक केली. त्यानंतर रॉयल स्टॅग,रॉयल चॅलेंज, मॅकडॉल नंबर वन, ग्रॅन्ड मास्टर ओडका, रॉयल ग्रीन,अमेरीकन प्राईड, व्हीईट मिसचीफ या कंपनीच्या बॉक्समधून ९८० बाटल्या चोरट्यांनी ताब्यात घेतल्या.
त्यानंतर गोदामातील इन्वर्टर व एक एलईडी कंपनीचा टीव्ही असा १.२१ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवला. दरम्यान, बार मालक शिखरे हे गुरुवारी गोदामात पाहणी करण्यासाठी गेले असता गोदामाचे पाठीमागील शटर उचकटलेले दिसून आले.
त्यामुळे त्यांनी गोदामातील बॉक्सची पाहणी केली असता त्यातील बाटल्या तसेच इन्व्हर्टर व एलईडी चोरट्यांनी पळविल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने आखाडा बाळापूर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी शिखरे यांच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुठे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बसवंते, जमादार शेख बाबर, प्रभाकर भोंग यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.