हिंगोली : जरांगे-पाटलांना पाठिंबा देण्यासाठी गोरेगावात कडकडीत बंद | पुढारी

हिंगोली : जरांगे-पाटलांना पाठिंबा देण्यासाठी गोरेगावात कडकडीत बंद

गोरेगाव; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे -पाटील यांनी १० फेब्रुवारीपासून सराटी अंतरवली येथे उपोषण सुरू केले आहे. उपोषणादरम्यान जरांगे यांची तब्येत खालावली आहे. सरकार त्यांच्या उपोषण आंदोलनाकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ आज (दि.१५) गोरेगावात (ता.सेनगाव)  कडकडीत बंद ठेवत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जरांगे यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. याचाही मराठा समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करत मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी आपला रोष व्यक्त केला.

मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे – पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली सराटी येथे उपोषण सुरू केले आहे. याच मुद्यावर मागच्या महिन्यात जरांगे- पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र सरकारने सकल मराठा समाज बांधवाला ओबीसीतुन आरक्षण देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र सरकारने आश्वासनाकडे पाठ फिरवली असल्याने जरांगे- पाटील यांनी परत उपोषण सुरू केले. १० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या उपोषणादरम्यान जरांगे – पाटील यांची तब्येत खालावली आहे. तरीही सरकार आरक्षणाबाबत योग्य ती दखल घेत नसल्याने आज गोरेगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच नारायण राणे यांनी जरांगे – पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button