हिंगोली: ठाकरे गटाचे सेनगाव बाजार समितीच्या आवारात आंदोलन | पुढारी

हिंगोली: ठाकरे गटाचे सेनगाव बाजार समितीच्या आवारात आंदोलन

सेनगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतीमालाचे भाववाढ करा, यासह विविध मागण्यांसाठी सेनगाव शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेशराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज (दि.१७) आंदोलन करण्यात आले. यावेळी सोयाबीनमध्ये कार्यकर्त्यांनी स्वत:ला बुजवून घेतले.

जिल्हाप्रमुख संदेशराव देशमुख यांच्यासह वशिम देशमुख, निखील देशमुख, जगन्नाथ देशमुख, सोंडू पाटील, पीनू पाटील, वैभव देशमुख, ब्रिजलाल तोष्णीवाल, राजू मोरे, देवीदास कुंदर्गे आदी कार्यकर्त्यांनी सोयाबीनच्या साठ्यात स्वतःला बुजवून घेतले. फक्त चेहरा उघडा ठेवला होता. यावेळी घोषणाबाजीने बाजार समितीचा परिसर दणाणून सोडला.

यावेळी पामतेल आयात बंद करा, सोयाबीन, तूर, कापसाला वाढीव भार देण्यात यावा, पीक नुकसान भरपाई व पीकविमा तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. विविध मागण्यांची वेळीच दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देशमुख यांनी यावेळी दिला. आंदोलन स्थळी चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. नायब तहसीलदार सरोदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Back to top button