‘न्या. शिंदे समिती बरखास्त करा; कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या’

‘न्या. शिंदे समिती बरखास्त करा; कुणबी प्रमाणपत्रांना स्थगिती द्या’

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी राज्य सरकारने न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली आहे. ही समिती बरखास्त करा आणि दोन महिन्यांत जी कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत, त्याला स्थगिती द्या, अशी मागणी ओबीसी नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी केली. पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते, अशा शब्दांत मनोज जरांगे यांच्यावर त्यांनी हल्लाबोल केला.

हिंगोली येथे आयोजित एल्गार सभेत ते बोलत होते. त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणीही लावून धरली. सर्वांची जनगणना करा. सर्वांचा सर्व्हे करा आणि मगच मागासलेपण ठरवा, असे ते म्हणाले.

ओबीसी समाज हा देशाचा निर्माणकर्ता आहे. त्यामुळे आमची लायकी काढण्याचे काही कारण नाही, असे सांगत भुजबळ यांनी शासकीय सेवेत मराठा समाज वरचढ असताना ओबीसीतून आरक्षण कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. संत महंत, शूर वीर, विचारवंत या सर्व क्षेत्रांत ओबीसी समाजाचा दबदबा राहिला असल्याचा दावा त्यांनी केला.

निरगुडे आयोग, गायकवाड आयोग यांना मराठा समाजाचे मागसलेपण सिद्ध करायला सांगितले असेल. मात्र माझे म्हणणे आहे की, सर्वच समाजांचे सर्वेक्षण करा. कोणता समाज मागास आहे याचा तौलनिक अभ्यास झाला पाहिजे. निरगुडे आयोगाला सांगणे आहे की, त्यांनी तौलनिक अभ्यास करा. मगच मागास कोण ते ठरवा. मंडल आयोगाने सांगितले, ओबीसी 54 टक्के आहेत. बिहारमध्ये झालेल्या जनगणनेनुसार तेथे ओबीसी 63 टक्के आहेत. जातनिहाय जनगणना होऊन जाऊद्या, असेही ते म्हणाले.

ओबीसींचा नाद करायचा नाही :  शेंडगे

ओबीसींचा कोणीच नाद करायचा नाही, असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. ओबीसी समाज एकवटला तर सर्वांचाच सुपडा साफ होईल, असेही ते म्हणाले.

भुजबळांशी युतीसाठी आम्ही तयार : जानकर

भुजबळ यांच्यासोबत युती करायला आम्ही तयार आहोत. यापुढे दलित – मुस्लिम समाजालाही आपल्यासोबत घ्यावे लागेल. बुद्धीने राजकारण करून समतावादी भूमी तयार करावी लागेल. त्यासाठी मतांच्या दृष्टीने समाजाने एकत्र येण्याची आवश्यकता रासपचे नेते महादेव जानकर यांनी व्यक्त केली.

भुजबळ यांना लक्ष्य केले जात असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा यावेळी लक्ष्मणराव गायकवाड यांनी दिला. आमचे घर पेटवण्यासाठी कोणी येणार असेल तर आम्ही गप्प बसणार नाही, असे टी. पी. मुंडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news