मराठवाड्यातील दुसरी ‘इको’ बटालियन हिंगोलीत; राज्य शासनाचा निर्णय

Hingoli: इको बटालियन
Hingoli: इको बटालियन
Published on
Updated on

गजानन लोंढे, हिंगोली : मराठवाड्यातील दुष्काळ आणि पाण्याच्या प्रश्नावर प्रभाविपणे मात करण्यासाठी वृक्ष लागवडीचा व्यापक कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्रीय संरक्षण विभागाअंतर्गत मराठवाडा विभागातील दुसरी इको बटालियन हिंगोलीत स्थापन करण्याचा शासन निर्णय मंगळवारी (दि.२९) घेण्यात आला. पाच वर्षाच्या कार्यकाळात तब्बल ६० लाख वृक्षांची लागवड होणार असून, हिंगोलीतील वनक्षेत्र वाढीस मोठा हातभार लागणार आहे.

मराठवाडयात छत्रपती संभाजीनगर येथे ५ जुलै २०१७ रोजी पहिली इको टास्क फोर्स बटालियन स्थापन झाली हाेती. या बटालियनच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, वनक्षेत्र वाढीस मदत होत आहे. वृक्षारोपण करून वृक्षांचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी बटालियनवर राहणार आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण मराठवाड्यात इको बटालियन स्थापण्याच्या हालचाली काही वर्षापासून सुरू होत्या. यासंदर्भात हिंगोली वनविभागाचे तत्कालीन विभागीय वन अधिकारी तथा नांदेडचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी २०१८ व मार्च २०२० मध्ये इको बटालियन स्थापन करण्यासंदर्भात राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता.

हिंगोलीतील वनक्षेत्र वाढावे यासाठी उपवनसंरक्षक केशव वाबळे हे आग्रही होते. त्यामुळे केंद्र शासनाच्या संरक्षण मंत्रालयाने १८ मे २०२३ रोजी हिंगोली व बीड येथील इको बटालियनच्या दोन कंपन्या स्थापन करण्यास मंजुरी दिली होती. केंद्र शासनाने मंजुरी दिल्यानंतर राज्य शासनाच्या महसूल व वनविभागाने २७ जून २०२३ रोजी शासन निर्णय काढून हिंगोली व बीड येथील इको बटालियनच्या स्थापनेचे आदेश दिले. हिंगोली व बीड या दोन जिल्ह्यामध्ये अतिरिक्‍त दोन कंपन्यांची स्थापना करून त्यासाठी आवश्यक त्या निधीसंदर्भात मंजुर अर्थसंकल्पीय निधीतून खर्च करण्याचे निर्देश दिले आहेत.

इको बटालियनचा कालावधी हा प्रत्यक्ष स्थापनेपासून पाच वर्ष इतका असून, पाच वर्षाच्या काळात वनविभाग व गायरान जमिनीवर वृक्षारोपण केले जाणार आहे. हिंगोलीत ६०० हेक्टर जमीन वनविभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने या जमिनीवर वृक्षारोपण केले जाणार आहे. सध्या वनविभाग व संरक्षण विभागाच्या अधिकार्‍यांकडून स्थळ पाहणी केली जात आहे. येलदरी किंवा सेनगाव येथे या बटालियनचे वास्तव्य राहणार असून येत्या काही महिन्यात प्रत्यक्ष वृक्षारोपणास सुरूवात केली जाणार आहे.

मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर हिंगोली व बीड येथे इको बटालियनच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाणार असल्याने हिंगोली जिल्हा हिरवागार होणार आहे. पर्यावरणाच्या रक्षणाबरोबरच येथील वनक्षेत्रातही वाढ होणार आहे. बटालियनच्या माध्यमातून पाच वर्ष वृक्षांचे संगोपन केले जाणार असल्याने पर्यावरणाचा समतोल राखल्या जाणार आहे.

इको बटालियनला ही लोकचळवळ बनेल : उपवनसंरक्षक केशव वाबळे

देशात सात ते आठ ठिकाणीच इको बटालियनची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर नंतर हिंगोली व बीड येथे इको बटालियनच्या अतिरिक्‍त तुकडीस मान्यता देण्यात आल्याने वृक्ष लागवड ही लोकचळवळ होणार आहे. इको बटालियनसाठी मी २०१८ व २०२० ला राज्य शासनाकडे प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावाला केंद्राच्या संरक्षण विभागाने व आता राज्य शासनाने मंजुरी दिल्याने इको बटालियनचा मार्ग मोकळा झाल्याचे नांदेड विभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांनी सांगितले.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news