बीड: शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

बीड: शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
Published on
Updated on

केज: पुढारी वृत्तसेवा: केज तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे सुपुत्र उमेश नरसु मिसाळ (वय २३) हे २५ मराठा लाईट इन्फन्ट्री बटालियनमध्ये कार्यरत होते. सुरतगड येथे सेवा बजावत असताना विजेचा शॉक लागून त्यांचा सोमवारी (दि.२६) मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात जन्मगावी आज (दि.२८) अंत्यसंस्कार करण्यात आले.

सुभेदार सुधाकर कुटाळ व त्यांचे सहकारी शहीद उमेश मिसाळचे पार्थिव घेऊन आज सकाळी ८.३० वाजता कोल्हेवाडी येथे पोहोचले. त्यानंतर फुलांनी सजविलेल्या ट्रकमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी उमेश मिसाळ 'अमर रहे' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्ययात्रेच्या मार्गावर रांगोळी काढून फुलांचा सडा टाकलेला होता. तसेच रस्त्याच्या दुतर्फा जिल्ह्यातील नागरिकांनी उभे राहून उमेश याचे अंतिम दर्शन घेत त्यांच्या पार्थिवावर फुलांची उधळण केली.

बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे, तहसीलदार एम. जी. खंडागळे, गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुशील मोराळे, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर शिंदे, भाजपचे अक्षय मुंदडा, २५ मराठा इन्फन्ट्रीचे सुभेदार सुधाकर कुटाळ, भाजपचे केज तालुकाध्यक्ष भगवान केदार, माजी सैनिक संघटनेचे प्रा. हनुमंत भोसले, मेजर अजिमोद्दीन इनामदार आदींनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर पोलीस दलाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. नंतर वडील नरसू मिसाळ यांनी चितेला अग्नी दिला. यावेळी उपस्थितांच्या अश्रूंचा बांध फुटला. उमेश मिसाळ यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे.

गणवेश पत्नीच्या स्वाधीन

अग्नी देण्यापूर्वी पार्थिवाला आच्छादलेला तिरंगी झेंडा आणि त्यांचा गणवेश सुभेदार सुधाकर कुटाळ यांनी पत्नी प्रतीक्षा व आई अंजनाबाई यांच्या स्वाधीन केले.

दहा महिन्यात प्रतीक्षाला आले वैधव्य

उमेश आणि प्रतीक्षा यांचा विवाह दहा महिन्यांपूर्वी २९ ऑगस्ट २०२२ रोजी झाला होता. आणि अवघ्या दहा महिन्यातच प्रतीक्षा हिला वैधव्य आले.

पतीच्या भेटीला आतुर झालेल्या प्रतीक्षाला पतीच्या अंत्यविधीला जाण्याचा दुर्दैवी प्रसंग

माहेरी असलेल्या पत्नी प्रतीक्षा हिला फोन करून रजा मंजूर झाली असून गावी येणार असल्याचे उमेश याने २६ जूनरोजी सांगितले होते. त्यामुळे प्रतीक्षा आनंदून गेली होती. तिने सासरी कोल्हेवाडी येथे निघण्याची तयारी केली होती. परंतु दुर्दैवाने सकाळी ८ वाजता तिला पतीच्या अपघाती निधनाची माहिती मिळाली. आणि पतीच्या भेटीला आतुर झालेल्या प्रतीक्षाला पतीच्या भेटीऐवजी पतीच्या अंत्यविधीला हजर राहण्याची दुर्दैवी वेळ आली.

दरम्यान, उमेश मिसाळ फेब्रुवारी २०२१ रोजी सैन्य दलात भरती झाले होते. बेळगाव येथील ९ महिन्याचे ट्रेनिंग संपल्यानंतर त्यांची पोस्टिंग २५ मराठा लाईट इन्फन्ट्रीमध्ये सुरतगढ येथे झाली होती.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news