बीड : धमक्या देऊन जबरदस्ती लग्न केलंय, मला वाचवा…बालवधुच्या पोस्टनंतर प्रशासनाकडून सुटका | पुढारी

बीड : धमक्या देऊन जबरदस्ती लग्न केलंय, मला वाचवा...बालवधुच्या पोस्टनंतर प्रशासनाकडून सुटका

बीड – पुढारी वृत्तसेवा : सर… माझे काल जबरदस्ती लग्न केलंय… मला खूप मारलंय… नाही लग्न केलं तर मारुन टाकीन अशा धमक्या देवून जबरदस्ती लग्न लावलंय… प्लीज मला वाचवा… अशी पोस्ट बालवधू झालेल्या मुलीने इन्स्टाग्रामवर केली अन् प्रशासन खडबडून जागे झाले. त्याच दिवशी तिची सुटका करत बालगृहात दाखल करण्यात आले असून आता दि. २४ जून रोजी माहेर व सासरकडील चौदा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीड तालुक्यातील कुटेवाडी येथील एका १७ वर्षीय मुलीचा पालवण येथील प्रदिप मस्के याच्याशी दि. १७ जून रोजी बालविवाह झाला. घरच्यांनी जबरदस्ती करुन विवाह केल्याची पोस्ट सदर मुलीने इन्स्टाग्रामवर केली. त्याची दखल घेत बीड ग्रामीण पोलिसांनी तिची दि. १८ जून रोजी सुटका केली.

यानंतर ग्रामसेवक दत्तात्रय लोमटे यांच्या फि र्यादीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात अशोक कुटे, राधा कुटे, विमल कुटे, सुर्यकांत काळे, गोदावरी काळे, छाया गव्हाणे, प्रदिप पंडित मस्के, पंडित मस्के, संगीता मस्के, मुलाचा मामा, मंडपवाला, छायाचित्रकार यांच्यासह इतर वीस ते तीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.

अशी होती पोस्ट

सर मी…. माझे काल जबरदस्ती लग्न केले. मला खूप मारलंय. नाही लग्न केलं तर मारुन टाकीन अशा धमक्या देवून जबरदस्ती करुन माझे लग्न केलंय… प्लीज मला वाचवा… पालवण गावात मस्के सोबत लग्न केलंय माझं…मी तुम्हाला सांगितलं असं सांगू नका…. मला मारुन टाकतीन… मला इथून घेऊन जावा… प्लीज… मी कंप्लेंट करील म्हणून मामा नी फोन जप्त केले घरातले आणि एक दिवसात लग्न केले… खूप त्रास दिलाय मला… प्लीज मला इथून घेऊन जावा…!

Back to top button