

हिंगोली : पुढारी वृत्तसेवा; मुख्यमंत्री साहेब, आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? असा सवाल उपस्थित करीत एका शेतकर्याने चक्क मुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून अतिवृष्टीची मदत नाकारल्याबद्दल आपला रोष व्यक्त केला असून शेतकर्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी केली आहे.
सेनगाव तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या भागात पंचनामे झाले. तालुका प्रशासनाने 32 कोटी 23 लाख 47 हजार 200 रूपये एवढा निधी अतिवृष्टी धारकांना वितरीत करणार असल्याचे सांगितले. परंतू, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव, आजेगाव, बाभुळगाव व पुसेगाव हे चार मंडळ अतिवृष्टीतून वगळण्यात आली. त्यामुळे येथील शेतकरी निराश झाले. शेतकर्यांच्या प्रश्नांवर आक्रमक भुमिका घेणार्या नामदेव पतंगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्ताने पत्र लिहून वगळलेल्या चार मंडळांचा समावेश करून अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याची मागणी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. अतिवृष्टीतून वगळण्यात आलेल्या या चार मंडळातील शेतकर्यांना आता मुख्यमंत्र्यांच्या उत्तराची प्रतिक्षा असून शेतकर्यांच्या नजरा सरकारच्या आदेशाकडे लागल्या आहेत.