

गंगाखेड; पुढारी वृत्तसेवा : येथील कृषी बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाच्या निवडीवेळी महाविकास आघाडीत फूट पाडत आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या पॅनलकडून वडील साहेबराव भोसले यांच्यासाठी सभापतीपद मिळविले. त्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव भोसले यांची पक्षाकडून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी व गंगाखेडचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनी आज (दि.१८) अखेर भाकरी फिरवली. चिंचटाकळी येथील राष्ट्रवादीचे निष्ठावंत व ज्येष्ठ कार्यकर्ते शंकरराव मोरे यांची तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली.
गंगाखेड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडीने बहुमताने जिंकली. मात्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव भोसले व त्यांचे वडील तथा संचालक साहेबराव भोसले यांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याशी राजकीय हातमिळवणी करून सभापतीपद मिळवले. यानंतर गंगाखेडचे माजी आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांच्या तक्रारीनंतर जिल्हाध्यक्ष बाबाजींनी दुर्राणी यांनी माधव भोसले यांची राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली होती.
यावेळी नूतन तालुकाध्यक्ष शंकरराव मोरे, माजी नगरसेवक बालाजी शेटे, सुनील चौधरी, राजेभाऊ सातपुते, मरडसगावचे सरपंच विक्रम काळे, दिलीप पुकाणे, सदाशिव भोसले, शिवाजी मुठाळ, शिवाजी सातपुते, खोबराजी भुमरे, महापूरीचे चेअरमन प्रकाश शिंदे, सरपंच वामन नागरगोजे, मारोतराव राठोड, चिंतामण भोसले, सुदामराव जाधव यांची उपस्थिती होती.
गंगाखेड तालुक्यात राष्ट्रवादी वाढीसाठी प्रयत्न करण्याऐवजी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या राष्ट्रवादीतील तालुक्यातील काही गद्दारांना व त्यांच्या पाठीराख्यांच्या चुकीला माफी नाही. गद्दार हे गद्दारच आहेत असा राजकीय संदेश माधव भोसले यांच्या हकालपट्टीतून पुढे आला आहे. शंकरराव मोरे सारख्या निष्ठावतांना पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुक्यात बळकट करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने सांघिक प्रयत्न करण्यात येतील.
हेही वाचा