बीड: अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती निवडीवरून धनंजय मुंडेंना धक्का
अंबाजोगाई (रमाकांत उडाणशिव) : अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठा पणाला लावली होती. अंबा कारखान्याचे माजी चेअरमन दत्तात्रय पाटील यांना सभापतीचे आश्वासन दिले होते. परंतु सभापती पद निवडीच्या दिवशी दत्तात्रय पाटील यांना धक्का देत सभापतीपद परळी मतदार संघाला तर उपसभापती पद केज मतदार संघाला बहाल केले. त्यामुळे नाराज पाटलांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राजेश्वर चव्हाण यांची बाजार समितीच्या सभापती पदी निवड झाली आहे. दरम्यान, पाटील यांच्या राजीनाम्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे.
अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली माजी आ. संजय दौंड यांनी निवडणुकीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी माजी सभापती गोविंदराव देशमुख, माजी आ. पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी मोठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या प्रतिष्ठेमध्ये साठे गटाला यांना उपसभापती पद मिळाल्यामुळे त्यांना त्यातच समाधान मानावे लागले आहे. तर दुसरीकडे बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सभापतीचे गाजर पक्षश्रेष्ठींनी दत्तात्रय पाटलांना दाखविले होते. या आशेवर त्यांनी आपली देखील प्रतिष्ठा पणाला लावली.
सभापती निवडीच्या चार दिवस आगोदर दत्तात्रय पाटील यांचेच नाव चर्चेत होते. परंतु त्यांची वर्णी न लागल्याने नाराज झालेले दत्तात्रय पाटील यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिल्यामुळे धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. सभापती व उपसभापती पदासाठी सुचित्रा देशमुख, सत्यजित सिरसाट, पाटोद्याचे बाळासाहेब देशमुख इच्छुक होते. माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांना देखील या प्रक्रियेत आपल्या कार्यकर्त्यांना पद न मिळाल्यामुळे त्यांच्याही चेहर्यावर नाराजी दिसून आली. या सर्व नाराज नाट्यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडते की काय? अशीच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा

