बीड : अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड | पुढारी

बीड : अंबाजोगाई बाजार समितीच्या सभापती पदी अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण तर उपसभापती लक्ष्मण करनर यांची निवड

अंबाजोगाई; पुढारी वृत्तसेवा : अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. राजेश्वर चव्हाण यांची तर उपसभापतीपदी लक्ष्मण करनर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील सगळ्यांचे लक्ष लागलेल्या अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलने घवघवीत यश संपादन करत 18 पैकी 15 जागेवर विजय मिळवला. त्यानंतर बाजार समिती सभापती पदी कोण विराजमान होणार तसेच आ. धनंजय मुंडे कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच सभापतीपदासाठी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन दत्तात्रय पाटील यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा होती. संबंधित पॅनल प्रमुखांनी त्यांना तसे अश्वस्तही केले असल्याची चर्चा होती. आज सभापती व उपसभापती पदांची उमेदवारी घोषित होईपर्यंत दत्ता आबा पाटील हेच सभापती होणार, असे संकेत मिळत होते. मात्र सभापती निवडीसाठीची बैठक सुरू होताच ऐनवेळी अॅड. राजेश्वर चव्हाण यांचे नाव निश्चित झाल्याचा फतवा पक्षश्रेष्ठींनी पाठवला आणि सभापतीपदी अॅड. राजेश्वर चव्हाण यांची तर उपसभापती पदी लक्ष्मण करनर यांचे नाव निश्चित होवून निवडणूक अधिकारी व्ही. एल. पोतंगले यांनी त्यांची निवड जाहीर केली.

बाजार सभापतीच्या सभापती पदी चव्हाण यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी त्याच्याकडून काढून त्यांच्या जागी दत्तात्रय पाटील यांची निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे चव्हाण यांची सभापतीपदी निवड करुन विधान परिषदेचे माजी सदस्य संजय दौंड यांनी आपल्या जुन्या पट्टीवडगाव जि. प. मतदार संघातील प्रबळ प्रतिस्पर्धी दूर केला असल्याची चर्चा होत आहे.

Back to top button