

Yuva Sena takes an aggressive stance on the mandatory installation of smart meters; warns of agitation
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : महावितरणकडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट वीज मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप करत युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांनी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्राहकांवर कोणत्याही प्रकारची सक्ती अथवा दडपशाही थांबवावी, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन अधीक्षक अभियंता, महावितरण यांना देण्यात आले.
स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये मोठी वाढ झाल्याच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वाढत्या वीजबिलांमुळे सर्वसामान्य नागरिक आर्थिक अडचणीत सापडत असून त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय, स्मार्ट मीटर बसविण्यास नकार देणाऱ्या ग्राहकांना नोटिसा बजावून दबाव टाकला जात असल्याच्याही तक्रारी समोर आल्या आहेत.
ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध कोणतीही कारवाई करणे अयोग्य असून अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढत असल्याचे युवासेनेचे म्हणणे आहे. ग्राहकांची संमती घेऊनच पुढील प्रक्रिया राबविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अन्यथा युवासेनेच्या वतीने जिल्हाभर जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा रवींद्र वाघमारे यांनी दिला आहे. दरम्यान, स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राज्यभर विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना धाराशिव जिल्ह्यातही हा विषय ऐरणीवर आला असून महावितरण प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
निवेदन देताना युवा सेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे, प्रदीप साळुंके, बंडू आदरकर, पंकज पाटील, राज निकम, राणा बनसोडे, राकेश सूर्यवंशी, तानाजी जाधवर, सह्याद्री राजेनिंबाळकर, अभिराज कदम, लखन देशमुख, कालिदास शेरकर, सतीश लोंढे, प्रवीण केसकर, मंगेश काटे, अमित कोकाटे, हर्षद ठवरे, किरण बोचरे, प्रदीप पोतदार, यांचे सह युवा सेनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.