

धाराशिव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माघारीची मुदत संपल्यानंतर आता जिल्ह्यातील राजकीय चित्र पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. बंडखोरी आणि अपक्षांच्या मोठ्या सहभागामुळे जिल्ह्यात सरळ लढती ऐवजी बहुरंगी लढती होणार असल्याचे निश्चित झाले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषद (गट) आणि पंचायत समिती (गण) मिळून एकूण तब्बल ६३० उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.
प्रत्येक तालुक्यात उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याने प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. विशेषतः तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यात सर्वाधिक चुरस पाहायला मिळत आहे.
सर्वाधिक उमेदवार धाराशिव तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मिळून सर्वाधिक १२६ उमेदवार (५१ गट + ७५ गण) रिंगणात आहेत. त्याखालोखाल तुळजापूर तालुक्यात १०१ उमेदवार (३५ गट ६६ गण) आहेत.
परंडा आणि भूममध्ये चुरस: परंडा तालुक्यात अवघ्या ५ गटांसाठी ३० उमेदवार असल्याने येथे एका जागेसाठी सरासरी ६ उमेदवार लढत आहेत, ज्यामुळे येथे प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. बंडखोरीचा फटका: उमेदवारी न मिळाल्याने अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.