Umarga Water Crisis : पाणीटंचाईचे संकट; १३ गावांत २३ विहिरींचे अधिग्रहण

उमरगा : काटकसरीने पाणी वापरण्‍याचे आवाहन; नागरिकांत चिंतेचे वातावरण
Water Crisis
Water CrisisPudhari
Published on
Updated on

उमरगा : तालुक्यात यंदा मान्सूनने अपेक्षित हजेरी न लावल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. अनेक गावांतील विहिरी आणि विंधन विहिरींची पाणीपातळी झपाट्याने खालावत असून नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी भीषण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेत तालुक्यातील १३ गावांमधील २३ विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण मंजूर केले आहे. कदेर व नाईचाकूर येथे प्रत्येकी चार, बेळंब रामनगर तांडा येथे तीन, तर गुगळगाव, चिंचोली जहागीर, बेटजवळगा आणि भगतवाडी- कोळेवाडी येथे प्रत्येकी दोन जलस्रोतांचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

Water Crisis
Nashik Dam Water Crisis| उत्तर महाराष्ट्रात भीषण पाणीबाणी! 5 लाख नागरिकांची तहान भागवण्यासाठी 226 टँकर मैदानात

याशिवाय इतर गावांतीलही जलस्रोत ताब्यात घेऊन पाणी पुरवठा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रशासनाच्या या उपाययोजना तात्पुरत्या स्वरूपाच्या असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे. गेल्या वर्षीही तालुक्यात ५२ गावांमध्ये तब्बल १६५ विहिरी व विंधन विहिरींचे अधिग्रहण करावे लागले होते. तसेच सात गावांमध्ये १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच १३ गावांतील २३ विहिरी व विंधन विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. जून महिन्यातच जलस्रोत आटण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून येत आहे. पावसाचा खंड कायम राहिल्यास अनेक गावांना टँकरवर अवलंबून राहावे लागू शकते.

Water Crisis
Uran Water Crisis : तीव्र उन्हाळ्याने रानसई, पुनाडे धरणांनी गाठला तळ

जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

भीषण पाणीटंचाईची धास्ती!

तालुक्यात यंदा १९ जूनपर्यंत केवळ ६४ मिमी पावसाची नोंद झाली असून पावसाच्या दीर्घ खंडामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावत आहे. अनेक विहिरी व हातपंप कोरडे पडले असून काही जलस्रोतांची पाणीपातळी धोकादायकरीत्या कमी झाली आहे. सध्या दिवसभर कडक ऊन, कोरडे वारे आणि अधूनमधून ऊन- सावलीचा खेळ सुरू आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही तर तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत असून यावरून परिस्थितीची गंभीरता स्पष्ट होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news