

भूम : वाशी व भूम पोलिसांनी संयुक्त कारवाई करत दोन पिकअप वाहनांमधून ६ लाख ५८ हजार ५२३ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला. या कारवाईत सुमारे १० लाख रुपये किमतीची दोन वाहनेही ताब्यात घेण्यात आली. एकूण १६ लाख ५८ हजार ५२२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
११ ऑगस्ट रोजी रात्री सुमारे दहा वाजता धाराशिव-बीड राष्ट्रीय महामार्गावरील दहिफळ शिवारातील विश्वजित ढाब्याच्या पाठीमागे दोन संशयित पिकअप वाहनांची तपासणी करण्यात आली.
यामध्ये महिंद्रा बोलेरो पिकअप (एमएच २३ एयू ५८१०) व अशोक लेलँड पिकअप (एमएच १४ ईएम ५१७३) यांचा समावेश होता. तपासणीदरम्यान वाहनांमध्ये गुटखा, पान मसाला असे प्रतिबंधित पदार्थ आढळले.
अन्न सुरक्षा अधिकारी रोहित दिनेश फंदी यांच्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनांचे चालक व अवैध वाहतुकीमागील व्यक्तींचा शोध सुरू आहे.