

दादासाहेब गलांडे
पैठण : सहा महिन्यांचा असताना वडिलांचे छत्र हरपले, तिसरीतच आईही गेली; संघर्षाच्या काळोखातून जिद्दीने वाट काढत विश्वास विजय झारगड यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC-CAPF मध्ये अखिल भारतीय १४५ वा क्रमांक मिळवत ‘असिस्टंट कमांडंट’ पदाला गवसणी घातली .आई-वडिलांचे प्रेम काय असते, त्यांची माया काय असते, हे उमजण्याच्या आधीच नियतीने विश्वासच्या आयुष्यातून आई-वडिलांची सावली हिरावून घेतल.
आयुष्याच्या सुरुवातीलाच आलेल्या या मोठ्या आघाताने अनेकांचे आयुष्य कोलमडले असते; पण विश्वासने मात्र परिस्थितीसमोर हार मानली नाही.आईच्या फोटोची प्रेरणा घेऊन संघर्ष जिद्द मनात ठेवूनअभ्यासात सातत्य ठेवल्यामुळे पैठणचा भूमिपुत्र विश्वास झारगड हा असिस्टंट कमांडर क्लास वन अधिकारी पदी निवड झाला आहे .
विश्वास याचं बीकॉमपर्यंत शिक्षण पुणे विद्यापीठात झालं 2022 पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू होती . आई-वडिलांचे निधन झालेले असून दोन बहिणी आ्हेत .आजोबा कै . प्रां .कचरू झारगड मामा तसेच काका डॉ. भारत झारगड आणि काकू सखुताई झारगड यांनी आई-वडिलांची उणीव जाणवू न देता त्याच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या मुलाप्रमाणे सांभाळली. मामा व्यंकटेश रुपनर यानी माझ्या जीवनात श्रीकृष्णाची भूमिका निभावली. प्रत्येक वळणावर प्रेरणेचा हात दिला.
कुटुंबाला लाभलेला सामाजिक सेवेचा वारसा आणि कै. झारगड मामा यांच्या समाजकार्याची प्रेरणा विश्वासच्या मनात रुजली. “शिक्षण केवळ स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी उपयोगी पडले पाहिजे,” ही भावना मनाशी बाळगत त्याने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याने ध्येय एकच ठेवले देशसेवेत अधिकारी म्हणून काम करण्याचे. अखेर मेहनतीला यश आले. UPSC-CAPF परीक्षेत अखिल भारतीय १४५ वा क्रमांक मिळवत विश्वासची पहिल्याच प्रयत्नात असिस्टंट कमांडंट (क्लास-१ अधिकारी) म्हणून निवड झाली.
ज्या डोळ्यांनी बालपणी आई-वडिलांना गमावल्याचे दुःख पाहिले, त्याच डोळ्यांत आज यशाचे अश्रू आहेत. हे अश्रू केवळ आनंदाचे नाहीत; ते आई-वडिलांच्या आठवणींचे, कुटुंबीयांच्या त्यागाचे आणि संघर्षावर मिळवलेल्या विजयाचे आहेत. विश्वासचे यश सांगून जाते की आई-वडिलांची सावली नशिबात नसली, तरी त्यांच्या संस्कारांची ऊब आणि आपल्या माणसांची साथ असेल, तर आभाळाएवढे स्वप्नही गाठता येते हे विश्वासने दाखवून दिले .
आईचा फोटो म्हणजे धैर्याचा, आत्मविश्वासाचा आधार
लेखी परीक्षा झाल्यानंतर सर्वांत कठीण टप्पा म्हणजे मुलाखत. अनुभवी आयएएस अधिकाऱ्यांच्या टीमसमोर बसून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना आत्मविश्वासाची खरी परीक्षा असते. मात्र माझ्यासाठी त्या क्षणी माझी आईच माझी ताकद होती. मुलाखतीला जाताना मी आईचा फोटो सोबत घेऊन गेलो होतो.
आईचा फोटो पाहिला की मन शांत होते आणि एक वेगळाच आत्मविश्वास मिळतो. मुलाखतीदरम्यानही आईचा फोटो पाहून मला प्रश्नांची उत्तरे देण्याची शक्ती मिळाली. आई आज माझ्यासोबत प्रत्यक्ष नसली, तरी तिची आठवण आणि आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, हीच भावना मनात ठेवून मी मुलाखत दिली असे विश्वास झारगड यांनी सांगितले.