

Two arrested for fleeing without paying for petrol at gunpoint
वाशी, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वरील वाशी फाटा ते सरमकुंडी फाटा दरम्यान असलेल्या प्रताप पेट्रोल पंपावर पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलचे पैसे न देता पळून जाणाऱ्या दोन इसमांना वाशी पोलिसांनी येरमाळा पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन अनोळखी इसमांनी चेहरा झाकून पेट्रोल पंपावरील कामगार तानाजी विष्णू भोरे यांना मोटारसायकलची टाकी फुल करण्यास सांगितले. पेट्रोल भरल्यानंतर ९६४ रुपये मागितले असता मागे बसलेल्या इसमाने पिस्तुल रोखून "बाजूला हो, नाहीतर गोळी घालीन" अशी धमकी देत पैसे न देता मोटारसायकलवरून पळ काढला.
घटनेची माहिती पेट्रोल पंप मालक संतोष शिवाजी काळे यांनी डायल ११२ वर दिली. पोलीस अंमलदार विलास जाधवर तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाशी पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. येरमाळा पोलिसांच्या मदतीने हॉटेल सूर्या परिसरात दोघांना ताब्यात घेण्यात आले.
अटकेत लखन शाहू मोहिते (रा. सपाळी, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, सध्या पारगाव ता. वाशी) व दिनेश भगवान चव्हाण (रा. कोपरा, ता. आंबेजोगाई, जि. बीड, सध्या पारगाव ता. वाशी) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून एअर गन, चाकू, पक्कड, दोन मोबाईल व होंडा शाईन मोटारसायकल जप्त करण्यात आली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके करीत आहेत.