

Tuljabhavani paid darshan rates issue
तुळजापूर : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानने दर्शन पासच्या शुल्कात मोठी वाढ केली आहे. या निर्णयामुळे भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या दरवाढीला अन्यायकारक ठरवत तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन दरांनुसार, २०० रुपयांचा दर्शन पास ३०० रुपयांना, तर ५०० रुपयांचा पास तब्बल १ हजार रुपयांना मिळणार आहे. स्पेशल गेस्ट दर्शनाचे शुल्क २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आले आहे. तसेच सकाळी अभिषेक करण्यासाठीचा पास ३०० ऐवजी ४०० रुपयांना उपलब्ध असेल. ऐन नवरात्रौत्सवात ही दरवाढ केल्याने भाविकांचा खिसा कापण्याचा प्रयत्न मंदिर प्रशासनाने केला असल्याची टीका होऊ लागली आहे.
मंदिर व्यवस्थापक तहसीलदार यांनी शनिवारी ही घोषणा केली असून, त्यानंतर तुळजापूर शहरात संतापाची लाट उसळली आहे. भाविकांसह तिन्ही पुजारी मंडळांनीही या दरवाढीला विरोध दर्शवला आहे. पुजाऱ्यांनीही आपली भूमिका जाहीर करत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना नेते श्याम पवार आणि शहरप्रमुख राहुल खपले यांनी जिल्हाधिकारी तसेच मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना निवेदन दिले आहे.
“मंदिर संस्थानने दर्शनाचा बाजार उभा केला असून, जिल्हाधिकारी अध्यक्ष असूनही भाविकांच्या सोयीपेक्षा आर्थिक व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे,” असा आरोप शिवसेनेने केला आहे. ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
देवीच्या मंदिरात पेड दर्शन बंद झाले पाहिजे. सामान्य माणसाला तुळजाभवानी देवीचे दर्शन सुलभ होण्याच्या अनुषंगाने हा प्रकारच बंद होणे आवश्यक आहे. पुजारी मंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय निर्णय होता कामा नयेत.
- ऋषिकेश मगर, काँग्रेस युवक नेते, तुळजापूर
सामान्य गोरगरीब भाविकांच्या भावना पायदळी तुडवण्याचे काम पेड दर्शना मधून होते. सामान्य भाविक अत्यंत दूरवरून दर्शनासाठी येतो. त्याच्यासाठी व्यवस्था करणे अत्यंत गरजेचे आहे. या काळात पेड दर्शन शुल्क वाढवणे अत्यंत चुकीचे आहे. ही वाढ रद्द होऊन पेड दर्शन यात्रा काळात बंद करावे.
- अमरराजे कदम, अध्यक्ष तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ