

तुळजापूर : तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचा गाभाऱ्याच्या जीर्णोद्धारासाठी काम सुरू केल्यानंतर ते काम कमजोर असल्याचे निदर्शनास आले आहे. यावरून तुळजापूर शहरातील जाणकारांनी देवीचा गाभारा नव्याने बांधण्यात यावा यासाठी जनजागृती करणेसाठी सह्यांची मोहीम सुरू केली असून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
‘श्री तुळजाभवानी देवीच्या मूर्ती रक्षणासाठी एक स्वाक्षरी देवीचा गाभारा संवर्धनासाठी’ या मोहिमेचा आज शुभारंभ करण्यात आला. देवीच्या गर्भगृहातील मूळ भिंतीवरील मार्बल व त्याखालील फरशी काढल्यानंतर गाभाऱ्याच्या छताचे बॅलेन्स सांभाळणाऱ्या (बीम कॉलम) दगडांना तडे गेल्याचे आढळून आले आहे. तसेच गाभाऱ्यातील भिंत मजबूत दिसत नाही. सध्या वारंवार भुगर्भातून गुढ आवाज होत असून, जमिन हादरत आहे. हे सर्व देवीच्या मूर्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे .
सध्याचा मूळ गाभारा काढून त्या ठिकाणी मूळ गाभाऱ्याचा स्वरूप देत धार्मिक रूढी परंपरां जपत 30 × 30 चा प्रशस्त नवीन गाभारा निर्मिती करावा म्हणजे पुढील शेकडो वर्षाच्या वाढत्या भाविक भक्तांच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. तुळजापुर शहरामध्ये स्वाक्षरी मोहीम श्री तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत वाकोजी बुवा गुरू तुकोजी बुवा, महंत माऊजीनाथ महाराज पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, माजी अध्यक्ष किशोर गंगणे, संचालक शिवाजी बोधले, इंद्रजित साळुंके यांच्या हस्ते राबवण्यात आले.
यावेळी आयोजक बाळासाहेब भोसले, सागर इंगळे, मयूर कदम, तुळजापूर शहरातील पुजारी, व्यापारी, सेवेदारी ज्येष्ठ नागरिक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हजारो वर्षाची परंपरा आणि इतिहास असणारे तुळजाभवानी देवीचे मंदिर पुढील हजारो वर्ष भक्कम रहावे यासाठी ही मागणी आम्ही करत आहोत प्रशासन आणि विशेषता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने स्थळ पाहणी करावी आणि निर्णय घ्यावा.
इंद्रजीत साळुंखे पुजारी तुळजापूर