Tuljabhavani Temple Darshan : सामान्यांना १२ तास, तर मटकाकिंग थेट गाभाऱ्यात!

तुळजाभवानी मंदिरातील दर्शनासाठीचे रॅकेट प्रशासनाकडून उद्ध्वस्त होणार कधी?
Tuljabhavani Temple Darshan
तुळजापूर : तुळजाभवानी मंदिरात भाविकांची अशी गर्दी असताना अनेकजण वशिलेबाजीतून थेट गाभार्‍यात दर्शन घेत आहेत. pudhari photo
Published on: 
Updated on: 

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : अगदी दोन-अडीचशे किलोमीटरहून आलेल्या सामान्य भाविकाला तुळजाभवानीचे दर्शन घ्यायचे असेल, तर किमान १० ते १२ तास रांगेत थांबावे लागते. पैसेवाला असेल, तर तो सशुल्क दर्शन घेतो. अर्थात, त्यालाही पाच-सहा तास तरी रांगेत घालवावेच लागतात. असे एका बाजूचे चित्र आहे. तर दुसरीकडे, तुम्ही दोन नंबरच्या धंद्याशी संबंधित असाल आणि तुमचा मोठा वशिला तुळजापुरात असेल, तर अवघ्या अर्ध्या तासात व्हीआयपी पास मिळवून तुम्ही थेट देवीच्या गाभाऱ्यात जाऊ शकता.

दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील एका मटका किंगला असेच दर्शन घडविल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मंदिर संस्थान समिती टीकेच्या केंद्रस्थानी आली आहे. या मटका व्यावसायिकावर सोलापूर जिल्हा प्रशासनाने तडीपारीची कारवाई केल्याचीही माहिती आहे. अशा व्यक्तीला व्हीआयपी पासच्या माध्यमातून देवीच्या गाभाऱ्यातून दर्शन मिळवून देणारी यंत्रणा ही नक्कीच राजकीय वरदहस्ताशिवाय शक्य नाही. त्यातही आता राजकारण आणि गुन्हेगारी विश्वातील अनेकांचा संबंध तसा उघड गुपित प्रकारातील आहे.

Tuljabhavani Temple Darshan
Ramdas Athawale | दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राकडून मदत मिळवून देणार : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

तुळजापूर शहरही त्याला अपवाद नाही. कालच्या घटनेने हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अगदी साठ-सत्तर किलोमीटरहून पायी येत देवीच्या चरणी भक्ती व श्रद्धा अर्पण करणारे भाविक अनेकदा महाद्वाराचे दर्शन घेऊन माघारी फिरतात. गर्दीमुळे अनेकदा ते येथूनच देवीचे दर्शन झाल्याचे समाधान मानून माघारी फिरतात, तर अनेक जण घामाच्या धारांत मुखदर्शनासाठी तासन्‌तास रांगेत उभे असतात. अशातच काही वर्षांपूर्वी उघडकीस आलेला व्हीआयपी दर्शनाचा काळाबाजार कालांतराने थांबला. मात्र, तो आता पुन्हा नव्याने सुरू झाल्याचे दिसू लागले आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत. त्यांच्या ‘पीए’चे नाव या दर्शनामुळे चर्चेत आलेले असले, तरी एकूणच तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठीची व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह असेल, याची काळजी घेण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे. जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कधी नव्हे ती यावेळी अगदी कठोर भूमिका घेत सहायक धार्मिक व्यवस्थापकाला निलंबित केले आहे, तर विश्वस्त विनोद गंगणे (नगराध्यक्ष) यांना नोटीस बजावली आहे.

Tuljabhavani Temple Darshan
Jalna Crime : छेडछाडीला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थिनीने जीवन संपवले

मटका किंगच्या दर्शनाच्या या प्रकारातून आता संधी आली आहे, तर प्रशासनाने घाव घालण्याची गरज आहे. गाभाऱ्यातून दर्शनाचा प्रकार, वशिलेबाजी आणि व्हीआयपी पासचा काळाबाजार या प्रकारांवर कडक निर्बंध आणून सर्वसामान्य भाविकांना अधिक सुलभपणे दर्शन कसे मिळेल, याची व्यवस्था आकाराला येण्याची अपेक्षा सामान्य भाविकांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news