

Tulja Bhavani Mata's Manchki Nidres begins from this evening
तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तथा शक्तिदेवता श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेस शनिवारी (२० डिसेंबर) मार्गशीर्ष अमावास्येच्या सायंकाळी प्रारंभ होत आहे.
त्याअनुषंगाने मातेच्या सायंकाळच्या नित्य पूजा ५.३० वाजता होणार असून ७ वाजता पूजाविधी पूर्ण होऊन मातेच्या मंचकी निद्रेची तयारी सुरू करण्यात येणार आहे. यावेळी सिंहासनावरील मूर्तीभोवतीचे मेण काढून मूर्ती हलविण्यात येणार आहे. शनिवारी सकाळपासूनच मातेच्या शेजघराची साफसफाई व मातेच्या शेजघरातील गादी, उशासाठी कापूस पिंजण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
या उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पूर्व तयारीसंदर्भात सर्व खातेनिहाय अधिकारी, कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन हा उत्सव प्रथा, पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना दिल्या आहेत.
श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला रविवारी (२८ डिसेंबर) दुपारी १२ वाजता घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी शनिवार, २० डिसेंबर (मार्गशीर्ष कृष्ण ३०, अमावास्या समाप्ती) रोजी सायंकाळ मातेच्या पंचामृत अभिषेकानंतर नित्योपचार पूजा, धुपारती अंगारा पार पडल्यानंतर मातेची मुख्यमूर्ती सिंह गाभाऱ्यानजीक असलेल्या शेजघरातील चांदीच्या पलंगावर निद्रिस्त करण्यात येणार आहे.
ही निद्रा २८ डिसेंबरच्या पहाटेपर्यंत चालणार असून आठ दिवसाच्या निद्रा सौख्यानंतर पौष शुक्ल अष्टमीदिनी मातेची मुख्यमूर्ती सिंहासनाधिष्ठीत करण्यात येऊन मातेच्या पंचामृत अभिषेक व शोड्षोपचार पूजेनंतर दुपारी १२ वाजता घटस्थापना होऊन शाकंभरी नवरात्र महोत्सवास घटस्थापनेने प्रारंभहोत आहे.
छोटा दसराच साजरा होणार
या नवरात्रोत्सवाला छोटा दसरा म्हणूनही संबोधण्यात येते. या नवरात्रोत्सवाची सांगता ४ जानेवारी रोजी पौष पौर्णिमेला घटोत्थापनाने होणार आहे. या नवरात्र महोत्सवात मातेच्या विविध वेशातील अवतार पूजा व रात्रौ छबिना पार पडणार आहेत. जलकुंभाच्या (जलयात्रा) मिरवणुकीचा सोहळाही पाचव्या माळेला पार पडणार आहे. भाविकांची यानिमित्ताने देवीदर्शनासाठी गर्दी उसळणार आहे.