

Tulja Bhavani Devi's Manchki Nidre has begun
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : शारदीय नवरात्र पूर्वी असणारी तुळजाभवानी देवींच्या मंचकी निद्रेला शानीवारी रात्री प्रारंभ झाला. रात्रीचे अभिषेक संपन्न झाल्यानंतर देवीच्या मंचकी निद्रेला प्रारंभ झाला असून घटस्थापनेच्या मध्यरात्री पुन्हा देवीची मूर्ती मुख्य सिंहासनावर प्रतिष्ठापित केली जाईल.
देवीचे सेवेकरी पलंगे कुटुंबीयांनी देवींचा पलंग व परिसराची स्वच्छता केली. आराधी महिलांनी मंचकी निद्रेसाठी आवश्यक असलेल्या गाद्यांमधील कापूस पिंजून परंपरागत पद्धतीने निद्रेसाठी लागणारी गादी बांधण्यात आली.
भाद्रपद कृष्ण अष्टमीपासून अमावास्या समाप्तीपर्यंत श्री तुळजाभवानी देवींची मंचकी निद्रा असते. त्यानंतर आश्विन शुद्ध प्रतिपदेला देवी सिंहासनावर आरूढ होतात. ८ दिवसांची मंचकी निद्रा पूर्ण करून ११ ऑक्टोबर रोजी पहाटे श्री तुळजाभवानी देवी पुन्हा सिंहासनावर विराजमान होणार आहेत.
यानंतर शारदीय नवरात्रोत्सवातील विविध धार्मिक विधींना सुरुवात होणार आहे. देशभरातील शक्तीपीठांच्या परंपरेत श्री तुळजाभवानी देवीचे विशेष महत्त्व आहे. श्री तुळजाभवानी देवींची मूर्ती चलमूर्ती असून, वर्षभरातील धार्मिक परंपरेनुसार देवी तीन वेळा एकूण २१ दिवस मंचकी निद्रा घेतात. यामध्ये शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस, सीमोल्लंघनानंतर पाच दिवस आणि शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी आठ दिवस मंचकी निद्रेची परंपरा आहे.
यावेळी संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार, तहसीलदार अरविंद बोळंगे, व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी महाराज, महंत वाकोजी महाराज, पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम, तुळजाभवानी पुजारी मंडळ अध्यक्ष विपीन शिंदे, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, सहायक व्यवस्थापक (सामान्य) जयसिंग पाटील, सहायक व्यवस्थापक (प्रशासन) नागेश शितोळे, लेखाधिकारी संतोष भेंकी, सिद्धेश्वर इंतुले, धार्मिक व्यवस्थापक रामेश्वर वाले, अनुप ढमाले उपस्थित होते