

Tree Plantation India World Of Record 15 lakh trees planted, praised by Guardian Minister
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा हरित धाराशिव अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील २३४ ग्रामपंचायती, १३ - नगरपालिका व ३ नगर पंचायती या ठिकाणी एक पेड माँ के नाम वृक्ष लागवड करीत १५ लाख वृक्षांची लागवड करून धाराशिव जिल्ह्याची इंडिया वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड व आशिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्हीमध्ये रेकॉर्ड मिळविले आहे. प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत हा उपक्रम शनिवारी (दि. १९) राबविला गेला. पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली.
पालकमंत्री म्हणाले, की आज लावलेले वृक्ष जगविण्यासाठी प्रशासनाबरोबर जनतेने जगविण्यासाठी काळजी घेतली तर धाराशिव जिल्हा निसर्गरम्य निश्चित होईल. त्यामुळेच जिल्ह्यातील वनराईचे चांगले नंदनवन होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. धाराशिव तालुक्यातील शिंगोली शिवारात वन विभागाच्या पाच हेक्टर क्षेत्रावर एक पेड माँ के नाम, जिल्हा प्रशासन आणि उत्स्फूर्त लोकसहभागातून हरित धाराशिव अभियान १५ लक्ष वृक्ष लागवडीचा प्रारंभ पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी आ. राण-जगजितसिंह पाटील, आ. कैलास पाटील, सिने अभिनेते स्वप्नील जोशी, माजी आ. ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, वनसंरक्षक प्रमोदचंद लाखरा, अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय अधिकारी वन व्ही. के. करे, प्रादेशिक विभागीय वन अधिकारी बी.ए.पोळ आदीची प्रमुख उपस्थिती होती.