

Farmers are being cheated through wind and solar power projects: Jagtap's complaint
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा लोहारा आणि उमरगा तालुक्यांमधील पवनचक्की आणि सौरऊर्जा प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शेतकरी नेते अनिल जगताप यांच्या नेतृत्व ाखाली शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तक्रार केली आहे.
माकणी, चिंचोली, करजगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी एका पवनचक्की कंपनीने २९ वर्षांच्या करारावर अत्यंत कमी दराने घेतल्याची माहिती समोर आली आहे. याच परिसरात इतर कंपन्यांनी दुप्पट बाजारभावाने जमीन खरेदी केल्यामुळे ही आर्थिक फसवणूक उघड झाली आहे. काही एजंटांनी शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत कवडीमोल मोबदल्यात जमिनी घेतल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंपनीने स्थानिक लोकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पाळले नाही. याशिवाय, पवनचक्की उभारणीसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीच्या वाहतुकीमुळे शेतकऱ्यांच्या इतर जमिनींचेही मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर आर्थिक फसवणुकीविरुद्ध आणि अशा प्रकल्पांसाठी योग्य नियमावली जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
तसेच, लवकरच तालुका नियंत्रण समितीकडेही याबाबत तक्रार दाखल केली जाणार आहे. या प्रकरणी बोलताना शेतकरी नेते अनिल जगताप यांनी सांगितले की, ज्या कंपन्या शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक करतील, त्यांच्या विरोधात लढा दिला जाईल आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. या निवेदनावर शेतकरी प्रतिनिधी धनंजय मुसांडे, शिरीष मुसांडे, शुभम साठे, पंडित ढोणे, सिंधुबाई साठे, प्रतीक मुसांडे, प्रज्ञा मुसांडे, वैभव पाटील, विजयमाला बिराजदार, पांडुरंग बिराजदार, आणि फुलचंद आळंगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.