Yedeshwari temple : येडेश्वरी मंदिर परिसरात वाहतूक कोंडी; पोलिसांच्या दुर्लक्षामुळे भाविक संतप्त

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्रीक्षेत्र येडेश्वरी देवी मंदिर परिसरात मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली
Yedeshwari temple : येडेश्वरी मंदिर परिसरात वाहतूक कोंडी;  पोलिसांच्या दुर्लक्षामुळे भाविक संतप्त
Published on
Updated on

Traffic jam in the Yedeshwari temple area; devotees angry over police negligence

बाळासाहेब जाधवर

रत्नापूर : पुढारी वृत्तसेवा कळंब तालुक्यातील येरमाळा येथील श्रीक्षेत्र येडेश्वरी देवी मंदिर परिसरात मंगळवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून येरमाळा पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे हजारो भाविकांना मनस्ताप सहन करावा लागल्याची तीव्र भावना भाविक व स्थानिक नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Yedeshwari temple : येडेश्वरी मंदिर परिसरात वाहतूक कोंडी;  पोलिसांच्या दुर्लक्षामुळे भाविक संतप्त
Narsi Chowk traffic issue : वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ‌‘नरसी चौका‌’चा श्वास गुदमरतोय!

मंगळवार हा देवीचा वार असल्याने पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होती. मात्र मुख्य रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहने आडवी-तिडवी उभी करण्यात आली होती. वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडाला असतानाही पोलिसांकडून कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.

सकाळी साडेअकराच्या सुमारास मंदिर परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुख्य रस्त्यावर वाहने अडकल्याने अनेक भाविकांना दर्शनासाठी पायी चालत जाण्याची वेळ आली. वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह आलेल्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागला. एवढी गंभीर परिस्थिती निर्माण होऊनही वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांचा ठोस बंदोबस्त दिसून आला नाही, अशी नाराजी व्यक्त होत आहे.

Yedeshwari temple : येडेश्वरी मंदिर परिसरात वाहतूक कोंडी;  पोलिसांच्या दुर्लक्षामुळे भाविक संतप्त
Sambhajinagar News : धोंडे, दीपदान, पूजनासाठी महिला भाविकांची गर्दी

येडेश्वरी मंदिर हे राज्यभरातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी गर्दी आणखी वाढते. हे माहित असूनही वाहतुकीचे नियोजन करण्यात येरमाळा पोलीस वारंवार अपयशी ठरत असल्याची टीका स्थानिक नागरिक करत आहेत.

मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनाही या वाहतूक कोंडीचा फटका बसत आहे. ग्राहकांना दुकानांपर्यंत पोहोचणे कठीण होत असल्याने व्यवसायावर परिणाम होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. "गर्दीच्या दिवशी पोलीस केवळ बघ्याची भूमिका घेतात. वाहनचालकांवर नियंत्रण नसल्याने दर आठवड्याला हीच परिस्थिती निर्माण होते," अशी प्रतिक्रिया काही स्थानिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, कामकाजातील अनियमिततेमुळे येरमाळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी एपीआय तात्याराव भालेराव यांच्यावर नुकतीच निलंबनाची कारवाई झाली आहे. त्यानंतरही पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीत कोणताही बदल दिसून येत नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सोयीसाठी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे ही पोलिसांची प्राथमिक जबाबदारी असताना त्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबाबत भाविक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news