

The concept of building a nation based on religion is dangerous.
कळंब, पुढारी वृत्तसेवा : देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या अथक प्रयत्नांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळाले असून, सर्वश्रेष्ठ भारतीय संविधानाच्या मूल्यांनुसार आज देशाचा राज्यकारभार सुरू आहे. हिंदी साहित्यातील राष्ट्रीय चेतनेचा विचार करताना सूर्यकांत निराला, माखनलाल चतुर्वेदी यांसारख्या साहित्यिकांचे योगदान समजून घेणे अत्यावश्यक आहे. त्यांच्या साहित्याबाबत शंका उपस्थित करणे म्हणजे साहित्य व कला क्षेत्रातील वातावरण बिघडविण्यासारखे आहे. या साहित्यिकांनी देशाप्रती गौरवशाली भावना प्रभावीपणे व्यक्त करून जनजागृती केली असून त्यांचे ऋण मानणे आपले कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
शि. म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात केंद्रीय हिंदी संस्थान, आग्रा (शिक्षा मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय 'हिंदी साहित्य में राष्ट्रीय चेतना' या विषयावरील राष्ट्रीय संगोष्टीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सबनीस म्हणाले की, भारतीय संविधान कोणत्याही धर्म किंवा संप्रदायावर आधारित नसून ते धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार करते.
धर्मवादी राष्ट्रनिर्मिती अत्यंत घातक ठरू शकते. भाषा ही संस्कृती व मानवतेचा विस्तार असून ती द्वेष शिकवत नाही. उद्घाटनपूर्वी 'शोधायन' विशेषांक या स्मरणिकेचे प्रकाशन प्रबंध संपादक प्रा. दत्ता साकोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेषांकात १२० लेखकांचे राष्ट्रीय एकात्मतेवरील लेख समाविष्ट आहेत. प्रा. रेखा शर्मा (हैदराबाद) यांच्या शुभेच्छा संदेशानंतर जोगेंद्रसिंग बिसेन यांनी बीजभाषण केले. त्यांनी कवी भूषण ते समकालीन कवींमधील राष्ट्रीय चेतनेचा अभ्यासपूर्ण आढावा घेत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. प्रा. प्रागारोती शैपले यांनी आभार प्रदर्शन केले.
या संगोष्टीत देशातील विविध प्रांतांतून १३५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संवलन प्रा. डॉ. दत्ता साकोळे यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर, प्रा. आबासाहेब बारकुल, डॉ. संजय कांबळे, डॉ. फत्ताराम नायक, डॉ. डी. विद्याधर, प्राचार्य हेमंत भगवान, उपप्राचार्य डॉ. के. डी. जाधव, प्रा. जयंत भोसले आदी उपस्थित होते. आयोजनासाठी हिंदी डॉ. दत्ता साकोळे, प्रा. मारुती शिंपले, प्रा. बालाजी बाबर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.