

बीड : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी टोलनाक्यावर सध्या विनाक्रमांकाच्या टिप्परचालकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. टोल वाचवण्यासाठी बॅरिकेड तोडून ही वाहने सुसाट वेगाने पळवली जात आहेत. या दादागिरीमुळे टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ही वाहने अवैध वाळू वाहतुकीचीच असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
तीन दिवसांपूर्वी रात्री उशीरा घडलेल्या एका घटनेने या प्रकाराचे गांभीर्य समोर आणले आहे. एका टिप्परचालकाने समोर वाहन आहे की नाही, किंवा एखादा कर्मचारी रस्त्यावर उभा आहे का, याची तमा न बाळगता बॅरिकेड तोडून सुसाट वेगात वाहन नेले. त्या पाठोपाठ आणखी दोन टिप्परही त्याच पद्धतीने निघून गेले. धक्कादायक बाब म्हणजे या वाहनांना ना ‘फास्ट टॅग’ होते, ना आरटीओचे नंबर प्लेट.
वाळू माफिया पुन्हा सक्रिय?
काही महिन्यांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, आता पुन्हा क्रमांक नसलेले आणि रात्रीच्या अंधारात सुसाट धावणारे टिप्पर पाहून वाळू माफिया पुन्हा सक्रिय झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. महसूल आणि पोलिस प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष का करत आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक दादांचीही दादागिरी
रात्री टिप्परचालक धुडगूस घालतात, तर दिवसा स्थानिक गुंड आणि स्वतःला ‘दादा’ म्हणवणारे लोक 50-100 रुपयांचा टोल वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांवर हात उचलत आहेत. महामार्ग पोलिस आणि वाहतूक पोलिस घटनास्थळी असूनही हस्तक्षेप करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याप्रकरणी गेवराई पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.