धाराशिव : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ युवक युवतींना व्हावा, या दृष्टिकोनातून राज्यामधील प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर राज्यातील नामांकित महाविद्यालयांमध्ये आचार्य चाणक्य कौशल्य केंद्राची स्थापना करण्यात येत आहे. जिल्ह्यातील १५ महाविद्यालयांमध्ये ही केंद्रे सुरु होत आहेत. त्याचे ऑनलाईन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. २०) ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार व कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस कॉलेज, तेरणा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, मदर कांचन कॉलेज, सह्याद्री नर्सिंग कॉलेज, राजर्षी शाहू कॉलेज ऑफ सायन्स, तुळजाभवानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तुळजा पूर, श्रीकृष्ण कॉलेज गुंजोटी, तात्याराव मोरे कॉलेज ऑफ फार्मसी उमरगा, भाऊसाहेब बिराजदार वरिष्ठ महाविद्यालय बलसूर, श्री स्वामी समर्थ आर्ट्स कॉलेज रूईभर, छत्रपती संभाजीराजे ज्युनिअर कॉलेज बेंबळी, शिक्षण महर्षी आर. जी शिंदे महाविदयालय परंडा, साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर कॉलेज रांजणी, सोपानकाका केळे आयटीआय कॉलेज वाशी, विद्यानिकेतन ज्युनिअर कॉलेज येरमाळा या १५ महाविद्यालयांची जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे यांनी यासंदर्भात सर्व उपायुक्त, सहायक आयुक्त आणि प्राचार्यांना पत्र पाठविले आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये आवश्यक बाबींची पूर्तता करून महाविद्यालय कौशल्य विकास केंद्र प्रशिक्षण प्रदाता यांच्यासोबत समन्वय साधून हा उद्घाटन कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला संबंधित महाविद्यालयात जास्तीत जास्त उमेदवारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ओम्बासे यांनी केले आहे.