

नळदुर्ग : शिवसेनेच्या जोरावर खासदार व आमदार झाल्यानंतरही ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पक्षाशी गद्दारी करून मातोश्री व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप करत नळदुर्ग येथे शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी आंदोलन छेडले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.
दि. २२ जून रोजी नळदुर्ग येथील संविधान चौकात शिवसेना (उबाठा) शहर शाखेच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यापूर्वी लोकमान्य वाचनालय ते संविधान चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी झालेल्या सभेत माजी उपजिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण यांनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर कठोर शब्दांत टीका करत, शिवसेनेने दोनदा आमदार आणि दोनदा खासदार केले तरी त्यांनी पक्षाशी गद्दारी केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत शिवसैनिक त्यांना योग्य उत्तर देतील.
या आंदोलनात माजी जिल्हाप्रमुख अजय दासरी, जि. प. सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, प्रदीप जोशी, बाळकृष्ण घोडके पाटील, संतोष पुदाले, सरदारसिंग ठाकूर यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनीही तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांचा प्रतिकात्मक निषेध केला.
आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविला. तसेच, त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.