

Bhandup Sanjay Dina Patil Sloganeering
भांडुप : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अलीकडील राजकीय घडामोडींमुळे मुंबईतील भांडुप परिसरात गुरूवारी (दि.१८) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्याच्या पार्श्वभूमीवर ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात हे आंदोलन करण्यात आले.
भांडुप रेल्वे स्थानकाजवळ, खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानापासून काही अंतरावर, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार सुनील राऊत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी काळे झेंडे फडकावत निषेध व्यक्त केला. तसेच खासदारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन करून त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या वेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी पक्षनिष्ठा आणि नेतृत्वावरील विश्वास व्यक्त करत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यांबाबत नाराजी व्यक्त केली. आंदोलनात मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष शिवसैनिक सहभागी झाले होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार सुनील राऊत यांनी खासदार संजय दिना पाटील यांच्यावर टीका केली. पक्षाने त्यांना विविध निवडणुकांमध्ये साथ दिली असून कार्यकर्त्यांनी त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या निवडणुकांसाठी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संजय पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत भविष्यात मतदार त्यांना योग्य उत्तर देतील, असा दावा त्यांनी केला.
राजकीय घडामोडींमुळे शिवसेना ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी काळात या घडामोडींचे पडसाद स्थानिक राजकारणातही उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.