

Road work slow, traffic jams
भूम, पुढारी वृत्तसेवा: शासकीय दूध योजना ते एमआयडीसी पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे. राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून शहरातील गोलाई चौक ते एमआयडीसी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली होती.
त्यामध्ये गोलाई चौक ते शासकीय दूध योजना पर्यंत ४५० मीटर काँक्रिट सिमेंट रस्त्याचे काम झाले आहे. पुढील शासकीय दूध योजना ते एमआयडीसी दीड किलोमीटरचे कटिंग करून डांबरीकरणासाठी रस्ता खोदन ठेवला आहे. मात्र, हे काम पूर्णपणे संथ गतीने सुरू आहे. मे महिन्यात पाऊस झाल्याने रस्त्याचे काम बंद पडले होते.
माती मिश्रित मुरुमामुळे एमआयडीसी, आष्टा वाडी, आष्टा, परंडा, जवळा, चिंचपूर, वालवड आदी गावांना व शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जाताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. एमआयडीसीमध्ये १० लहान मोठे उद्योगांसह दूध डेअरी आहेत. शासकीय दूध योजना ते एमआयडीसी रस्त्याचे काम रखडल्यामुळे तारेवरची कसरत करत करावी लागत आहे.
मला एमआयडीसी मध्ये रोज येजा करावी लागते. रस्त्याच्या सध्याच्या अवस्थेमुळे माझ्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ लक्ष घालून रस्त्याचे काम मार्गी लावावे असे उद्योजक रणजित साळुंके यांनी सांगितले.
रस्त्याच्या मधोमध खडी टाकली आहे. यामुळे अपघात होत आहेत. गाडीचे टायर फुटत आहेत. या रस्त्याच्या गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना होईल. त्यामुळे रस्त्याचे काम तत्काळ करावे, असे संजय साबळे यांनी सांगितले.
शासकीय दूध योजना ते एमआयडीसी रस्त्याचे डांबरीकरणाचे काम चालू आहे. सध्या खडी अंथरण्याचे काम चालू आहे १४ ऑगस्टअगोदर खडीकरणाचे काम पूर्ण होणार असून, पुढील डांबरीकरणाचे काम पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर अगोदर होईल अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागचे आर. आर. गिराम यांनी सांगितले.