

धाराशिव : राज्यात घडलेल्या एका घटनेवरून जनतेला संतप्त भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, असे सांगत अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना झालेली मारहाण चुकीची होती, अशी स्पष्टोक्ती दिली. सभागृहात मोबाईलवर पत्ते खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मात्र पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, असे सांगितले.
खा. तटकरे सोमवारी पक्ष मेळाव्यासाठी शहरात आले होते. त्यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लातूरमध्ये झालेल्या प्रकाराला चुकीचे ठरवत, या संदर्भात मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाण यांना आपल्या पदाचा राजीनामा देण्यास पक्षाने सांगितले आहे. तर कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, अशी माहिती तटकरे यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषद संपल्यानंतर, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषीमंत्र्यांच्या निषेधाची आणि कर्मजाफीची घोषणाबाजी केली. लातूर येथे छावा संघटनेचे विजय घाडगे यांना मारहाण झाल्यानंतर, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दुसऱ्या दिवशी, सोमवारी धाराशिवचा दौरा केला. त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन तुळजापूर येथून केली. येथील छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते धाराशिवला आले. त्यांनी मेळावा घेऊन नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार विक्रम काळे, आनंद परांजपे, सुरेश बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे आदी उपस्थित होते.
खा. तटकरे म्हणाले की, जळगाव, धुळे, बीड, लातूर येथे मेळाव्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, कार्यकर्त्यांचे मनोगत समजून घेण्यासाठी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यातून स्थानिक स्वराज्य निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ मिळेल.
पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तटकरे यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, "संजय राऊत हे दिवसभरात सत्तेचे स्वप्न पाहतात. त्यामुळे स्वप्नात जे दिसते ते बोलतात." असे म्हणून त्यांनी त्यांची खिल्ली उडवली.